राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? शर्मिला ठाकरेंचा एकच शब्द पण, सस्पेन्स कायम
Mumbai News : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही भावांच्या राजकारणातील वाटा वेगळ्या झाल्या आहेत. मात्र तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही भावांनी एकत्र यावं असं वाटत असतंच. जेव्हा केव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात तेव्हा या चर्चा हमखास सुरू होतात. आताही तशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याला निमित्त ठरलं घरगुती कार्यक्रमाचं. काही दिवसांपूर्वी हे दोन्ही भाऊ एका घरगुती कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यामुळे आता राजकारणातही एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली. याच मुद्द्यावर प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना प्रतिक्रिया विचारली. त्यांनी मात्र एकाच शब्दांत उत्तर देत स्पष्ट सांगितलं.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या, माझ्या नणंदेच्या मुलाचा साखरपुडा होता. घरातील सर्व लोक अशावेळी एकत्र येतात. माझी नणंद राजकारणात नाही. राज जसा तिचा भाऊ तसाच उद्धवही आहे. त्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता बघूया.. अशा एकाच शब्दांत उत्तर दिलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू आमनेसामने आले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आमचा प्रश्न अदानींना होता पण, चमचे जोरात का वाजताय अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला नंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रत्युत्त दिले होते. दोन वर्षांपूर्वी अदानी मातोश्री येथे कशासाठी गेले होते याचं उत्तर तुम्ही शोधा. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांचे हात धरले होते का. चांंगले निर्णय घेण्यासाठी त्यांना कुणी अडवलं होतं. धारावीचा पुनर्विकास करायचा होता मग तुम्ही का केला नाही, असे सवाल शर्मिला ठाकरे यांनी केले होते.
मराठा आरक्षणासाठी तुमच्या सरकारच्या काळात विधेयक पास करायचे होते. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस बहुमतात होते त्यावेळी आरक्षण देऊन टाकायचे होते. धारावीचा विकास करायचाच होता मग करून टाकायचा. धारावीच्या विकासकामांचे टेंडर काढून जो कुणी चांगला असेल त्याला काम द्यायचे होते असेही शर्मिला ठाकरे यावेळी म्हणाल्या होत्या.