Ajit Pawar: झालं गेलं गंगेला मिळालं, असे अजित पवार का म्हणाले?
पुणे- मुंबई महापालिकेत शिवसेनेची (Shiv Sena) ताकत जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून सरकार चालवताना आम्ही सांगितले होते की आपण मुंबईमध्ये (Mumbai) एकत्र काम करु. त्यावेळी त्यांनी साकारात्मक प्रतिसाद दिला होता, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
शिवसेनेला वंचित बरोबर युती करायची असेल तर शिवसेनेच्या कोट्यातील जागा द्याव्या लागतील अशी चर्चा आहे. यावर अजिता पवार म्हणाले, मी स्वत: उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो की ज्या पक्षाचे मित्र पक्ष आहेत. त्यांनी त्यांच्या कोट्यातून जागा द्यायच्या. पण मी हे फक्त महानगरपालिकेच्या संदर्भाने बोललो होतो, असे अजित पवार शिवसेना-वंचितच्या युतीवर म्हणाले.
गेल्या सहा महिन्यात राजकीय परिस्थिती बदलली आहे. काल त्यांच्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की आमची युती सध्या महानगरपालिकेपुरती आहे. पण एकदा संबंध जुळले की पुढं जायला अडचण येत नाही. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांची युती कशी पुढं जाती हे पहायला मिळेलं.
आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधानपरिषदेच्या निवडणूका, चिंचवड व कसबा पोटनिवडणुक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी याबाबत चर्चा झाल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.
उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उध्दव ठाकरे यांची आज मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट घेणार आहोत त्यावेळी यावर स्पष्टपणे चर्चा करु व त्यानंतर आमची भूमिका मांडू असे स्पष्ट केले.
राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती-आघाडी होते त्यावेळी ‘मागचं झालं गेलं गंगेला मिळालं’ असं करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.
चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, कॉंग्रेससोबत चर्चा करतोय. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणूका लढवल्या जाव्यात ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितला जाईल असेही अजित पवार म्हणाले.
एखाद्याची महत्त्वाची नेमणूक ज्यांनी केली आहे त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करायची असते त्यातूनच राज्यपालांनी ती इच्छा व्यक्त केली असावी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.