‘मेक इन इंडिया’च्या तोफा आता शिर्डीतून धडाडणार ! जगातील तिसरा सर्वात मोठ्या आर्टिलरी शेल प्रकल्प

या प्रकल्पात 155 एमएम, 120 एमएम, एल-50 आणि 125 एमएम क्षमतेचे तब्बल पाच लाख आर्टिलरी बॉम्ब शेल दरवर्षी तयार केले जाणार आहेत.

  • Written By: Published:
Radhakrishna Vikhe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला महाराष्ट्रातून मोठी ताकद मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आता देशाच्या संरक्षण उद्योगाचे नवे शक्तिकेंद्र बनणार आहे. निबे इंडस्ट्रीजच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य ‘डिफेन्स हब’चे उद्घाटन 23 मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे, प्रतिवर्ष तब्बल पाच लाख आर्टिलरी बॉम्ब शेल तयार करण्याची क्षमता असलेला हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प ठरणार आहे.

कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि निबे ग्रुपचे अध्यक्ष गणेश निबे (Ganesh Nimbe) यांनी पत्रकार परिषदेत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पुढाकाराने शिर्डी एमआयडीसीमध्ये अवघ्या 12 महिन्यांत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

‘मेक इन इंडिया’च्या तोफा आता शिर्डीतून धडाडणार

या प्रकल्पात 155 एमएम, 120 एमएम, एल-50 आणि 125 एमएम क्षमतेचे तब्बल पाच लाख आर्टिलरी बॉम्ब शेल दरवर्षी तयार केले जाणार आहेत. याशिवाय, भारताच्या संरक्षण क्षमतेत मोठी भर घालणारे 300 किमी पल्ल्याचे अत्याधुनिक ‘युनिव्हर्सल रॉकेट लाँचर’ही विकसित करण्यात आले आहे. सध्या भारताकडे 70 किमी मर्यादेचे ‘पिनाका’ रॉकेट सिस्टम असताना, शिर्डीत विकसित होणारे हे तंत्रज्ञान संरक्षण क्षेत्रासाठी गेमचेंजर मानले जात आहे.

चीननंतर एवढी क्षमता असलेला भारतातील पहिलाच प्रकल्प

टीएनटी, आरडीएक्स आणि एचएमएक्स या स्फोटकांच्या उत्पादनासाठी या प्रकल्पात तब्बल 25 हजार टन क्षमतेची सुविधा उभारण्यात आली आहे. चीननंतर एवढ्या मोठ्या क्षमतेचा हा एकमेव प्रकल्प असल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, संरक्षण उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारताचे परदेशांवरील अवलंबित्व जवळपास संपुष्टात येणार आहे.


3 हजार कोटींची गुंतवणूक; पाच हजार रोजगार

शिर्डी डिफेन्स हबमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. एकूण 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पामुळे पाच हजारांहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. सध्या 200 एकर क्षेत्रात उभारण्यात आलेला हा प्रकल्प भविष्यात 3200 एकरांपर्यंत विस्तारला जाणार आहे. तयार होणाऱ्या उत्पादनांपैकी 70 टक्के उत्पादने परदेशात निर्यात केली जाणार आहेत.

सुसाईड ड्रोनपासून सॅटेलाईटपर्यंत मोठी झेप

संरक्षण क्षेत्रासोबतच अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातही निवे ग्रुप मोठी उडी घेत आहे. इस्रोच्या सहकार्याने येत्या पाच महिन्यांत स्वतःचा ‘ऑप्टिकल सॅटेलाईट’ लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

तसेच, नेपिअर गवतापासून दिवसाला १ लाख सिलेंडर भरण्याची क्षमता असलेला बायो-सीएनजी प्रकल्पही सुरू करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी टाटा समूहाच्या सहकार्याने ‘स्किल ट्रेनिंग सेंटर’ उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
शिर्डी आता केवळ श्रद्धेचे केंद्र राहणार नसून, भारताच्या संरक्षण सामर्थ्याची नवी ओळख बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

follow us