Accident : फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; दुर्घटनेत 13 जणांचा होरपळून मृत्यू

Accident : फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; दुर्घटनेत 13 जणांचा होरपळून मृत्यू

बेंगळूरू : फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. बेंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मल्लिकार्जुन बलदंडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आथिबेलेजवळ असलेल्या बालाजी क्रॅकर्स फटाक्यांच्या गोदामात हा अपघात झाला. गोदामात वाहनातून फटाके उतरवत असताना हा अपघात झाला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर पहाटेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी गोदामात 20 जण होते. त्यातील काही जण जीव मुठीत धरुन बाहेर पडण्यात यशस्वी झाले. (13 people died in a fire at a crackers shop)

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विट करून अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, बेंगळुरूमधील आथिबेलेजवळ जवळील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. मी अपघातस्थळी जाऊन पाहणी करणार आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांनासोबत सरकारच्या संवेदना आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना सरकार 5 लाख रुपयांची मदत देणार

कर्नाटक सरकारने भीषण आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत भरपाई जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी शनिवारी रात्री घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

शिवकुमार म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी फोनवर बोललो. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. पोलीस अपघाताची कसून चौकशी करत आहेत. अग्निसुरक्षेचे नियम पाळले गेले की नाही हेही ते तपासत आहेत.

शिवकुमार म्हणाले की, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील फटाक्यांची दुकाने आणि गोदामांमध्ये आगीच्या जोखीम नियंत्रण नियमांचे पालन करण्याबाबत खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube