धक्कादायक! रुग्णवाहिका न आल्याने राजभवनासमोरच रिक्षात महिलेची प्रसूती; बाळाचा मृत्यू

धक्कादायक! रुग्णवाहिका न आल्याने राजभवनासमोरच रिक्षात महिलेची प्रसूती; बाळाचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये राजभवन आणि उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या घरासमोरच एका महिलेने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णवाहिका येण्यास उशीर झाल्याने गर्भवती महिला रिक्षाने रुग्णालयात जात होती. यादरम्यान, तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि महिलेने रस्त्याच्या कडेला बाळाला जन्म दिला. मात्र जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (A woman gave birth to a child on the roadside in front of the gate of Raj Bhavan)

याबाबत अधिक माहिती अशी की, रुग्णवाहिका येण्यास वेळ होत असल्याने रुपा नावाची महिला तिच्या पतीसोबत रिक्षातून हॉस्पिटलमध्ये जात होती. प्रवासादरम्यान, महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर रिक्षा थांबवून रस्त्याने जाणाऱ्या महिलांनी राजभवनाच्या गेटसमोरच पीडितेची प्रसूती केली. लोकांनी ताबडतोब साड्यांचा आडोसा तयार करुन वेदनेने ओरडत असलेल्या गर्भवती महिलेला मदत केली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने महिलेला आणि नवजात अर्भकाला रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात बाळाला मृत घोषित करण्यात आले.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. व्हिडीओ शेअर करत त्यांनी ट्विटरवर म्हटले की, एक तर लखनऊ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे राजभवनासमोर… तरीही रुग्णवाहिका न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. यावर मुख्यमंत्र्यांना काही बोलायचे आहे की आमच्या भाजपच्या राजकारणासाठी बुलडोझर आवश्यक आहेत, जनतेसाठी रुग्णवाहिका नाही, असाच त्यांचा अजूनही दावा आहे.

माजी मंत्री शिवपाल यादव यांनीही या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी लिहिले की, लाखो जाहिराती आणि दावे करूनही राज्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने राजभवनाजवळील रस्त्यावर रिक्षात बसून रुग्णालयात जाणाऱ्या गर्भवती महिलेची प्रसूती व्हावी, ही घटना संपूर्ण यंत्रणेसाठी लाजिरवाणी असून राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे खरे वास्तव समोर आले आहे.

आरोग्यमंत्री काय म्हणाले?

या प्रकरणाची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री ब्रजेश पाठक स्वत: रुग्णालयात गेले आणि पीडित महिलेच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व माता-भगिनींना चांगली वागणूक देण्याची जबाबदारी आमची आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नसल्याची चर्चा आपण सोशल मीडियावर पाहिली. ही घटना कोणत्या परिस्थितीत घडली याचा तपास सुरू आहे. थोडा जरी हलगर्जीपणा आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube