अभिनेते कमल हासन यांचं कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कर्नाटकात निषेध व्यक्त करत माफी…

Actor Kamal Haasan’s statement on Kannada language : दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी त्यांच्या आगामी ठग लाइफ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलं. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असं ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कमल हासन यांनी तमिळमध्ये उयिरे उरवे तमिळे असं म्हटलं होतं. याचा अर्थ असा आहे की माझं आयुष्य आणि माझं कुटुंब ही तमिळ भाषा आहे. त्यानंतर त्यांनी कन्नड अभिनेते शिवराजकुमार यांच्या उपस्थितीचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, अभिनेते शिवराजकुमार हे माझ्या कुटुंबासारखे आहेत, जे दुसऱ्या राज्यात राहतात. त्यामुळे ते इथे आहेत. म्हणून जेव्हा मी माझं भाषण सुरू केलं, तेव्हा माझं आयुष्य आणि माझं कुटुंब तमिळ असल्याचं म्हटलंय. तुमची भाषा (कन्नड) तमिळ भाषेतून जन्माला आली. त्यामुळे त्या ओळीत तुमचा उल्लेख होता. शिवराजकुमार हे कन्नड अभिनेते असून शनिवारी झालेल्या कार्यक्रमात तेसुद्धा उपस्थित होते.
कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून कर्नाटकात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कन्नड संरक्षण वेदिकेसारख्या कन्नड समर्थक संघटनांनी कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अशी वक्तव्ये भविष्यातही केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. इतकंच नव्हे तर कन्नड समर्थकांनी बेंगळुरूमधील ठग लाइफ या चित्रपटाचे बॅनरसुद्धा फाडले.
Kamal Haasan: कमल हसनच्या ठग लाइफने रिलीजपूर्वीच कमावले 100 कोटी!
कन्नड रक्षण वेदिकेचे नेते प्रवीण शेट्टी म्हणाले, “तमिळ ही कन्नडपेक्षा चांगली आहे आणि तमिळचा जन्म झाल्यानंतरच कन्नड भाषा आली, असं कमल हासन यांनी म्हटलंय. जर तुम्हाला कर्नाटकात व्यवसाय करायचा असेल तर अशी अपमानास्पद वक्तव्ये करू नयेत अशी आम्ही त्यांना ताकीद देतो. आज आम्ही त्यांच्यावर काळी शाई फेकण्यास तयार होतो, पण ते कार्यक्रम स्थळ सोडून निघून गेले. कर्नाटकात तुमच्या चित्रपटावर बंदी घातली जाईल, असा थेट इशारा आम्ही देतो.
कमल हासन हे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बेंगळुरूमधील एका कार्यक्रमात पोहोचले होते. त्याठिकाणी कन्नड समर्थक गटांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. त्याच ठिकाणी त्यांच्यावर काळी शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. परंतु या योजनांची जाणीव होताच कमल हासन यांनी तिथून काढता पाय घेतला, असं निदर्शक म्हणाले. कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित कमल हासन यांना फटकारलं.
कलाकारांनी सर्व भाषांचा आदर केला पाहिजे. त्यांनी केवळ कन्नड भाषेचाच अपमान केला नाही तर अभिनेते शिवराजकुमार यांचं नाव वापरून तमिळ भाषेची स्तुती करणंदेखील चुकीचं आहे. कन्नड भाषेला 2500 वर्षांहून अधिक जुना सांस्कृतिक वारसा आहे. अशा वक्तव्यांनी या वारशाला कमी लेखता येणार नाही. कमल हासन यांनी याआधीही हिंदू धर्म आणि धार्मिक भावनांचा अपमान केला होता. आता त्यांनी 6.5 कोटी कन्नड भाषिकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी कन्नड भाषिकांची निर्विवाद माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.