Zomato-Swiggy ला AI मुळे घरघर पण, करोडो भारतीयांची सवय तारून नेणार : BofA

AI vs Zomato-Swiggy भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मोबाईल डेटा स्वस्त आहे आणि AI टूल्सचा वापरही सातत्याने वाढत आहे. मात्र...

  • Written By: Published:
AI vs Zomato-Swiggy

AI vs Zomato-Swiggy : AI मुळे येणाऱ्या काळात Zomato, Swiggy आणि MakeMyTrip सारख्या लोकप्रिय ॲप्सची जागा संपेल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. यावर आता बँक ऑफ अमेरिका (BofA) ने एका महत्त्वाच्या रिपोर्टद्वारे सत्य परिस्थिती स्पष्ट केली आहे. अहवालानुसार, भारतात AI चा वापर झपाट्याने वाढत असला तरी AI मुळे Zomato, Swiggy किंवा MakeMyTrip सारखी ॲप्स लवकरच बंद पडतील, अशी शक्यता सध्या तरी अत्यंत कमी आहे. यामागे भारतीय ग्राहकांच्या सवयी आणि त्यांचा विश्वास हे सर्वात मोठे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

AI तयार आहे, पण भारतीय ग्राहक अजून नाहीत

BofA च्या अहवालानुसार, भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मोबाईल डेटा स्वस्त आहे आणि AI टूल्सचा वापरही सातत्याने वाढत आहे. मात्र, भारतीय ग्राहक एका AI असिस्टंटवर सर्व कामांसाठी अवलंबून राहण्यास अद्याप तयार नाहीत. भारतात प्रत्येक कामासाठी स्वतंत्र ॲप वापरण्याची सवय आहे. जेवणासाठी Swiggy किंवा Zomato, प्रवासासाठी MakeMyTrip किंवा Ixigo, ऑनलाइन खरेदीसाठी वेगळे ॲप आणि पेमेंटसाठी वेगळे ॲप वापरणे ही ग्राहकांची ठरलेली पद्धत बनली आहे.

‘सुपर ॲप’ मॉडेल भारतात अजूनही अपयशी

अहवालात म्हटले आहे की, भारतात एकाच ॲपवर सर्व सेवा देणारे ‘सुपर ॲप’ मॉडेल विशेष यशस्वी ठरलेले नाही. त्यामुळे भविष्यात एकच AI असिस्टंट सर्व ॲप्सची जागा घेईल, अशी शक्यता सध्या तरी कमी आहे.

विश्वास हीच सर्वात मोठी अडचण

भारतीय ग्राहक ऑनलाइन खरेदी किंवा बुकिंग करण्यापूर्वी अनेक पर्याय तपासतात. मित्र, कुटुंबीय, WhatsApp ग्रुप, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया किंवा इतरांच्या अनुभवांवरही ते भर देतात. विशेषतः लहान शहरांमधील ग्राहक AI ला पूर्णपणे स्वयंचलित निर्णय घेण्याची परवानगी देण्यास अजूनही सहज तयार नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

OpenAI ने मोठ्या भारतीय कंपन्यांशी केली भागीदारी

दरम्यान, AI कंपन्या केवळ माहिती देण्यापुरत्या मर्यादित राहू इच्छित नाहीत. ग्राहकांच्या वतीने खरेदी, बुकिंग आणि इतर व्यवहार पूर्ण करणारे AI असिस्टंट विकसित करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर OpenAI ने भारतातील Eternal, Nykaa, MakeMyTrip आणि Ixigo यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. यामागचा उद्देश ChatGPT ला फक्त माहिती देणाऱ्या टूलऐवजी, प्रॉडक्ट शोधणे, किंमतींची तुलना करणे आणि गरज पडल्यास खरेदी किंवा बुकिंग पूर्ण करणारे स्मार्ट प्लॅटफॉर्म बनवण्याचा आहे.

ॲप्स बंद नाही, तर अधिक स्मार्ट होणार

बँक ऑफ अमेरिकेच्या मते, AI भविष्यात या ॲप्सची जागा घेण्याऐवजी त्यांचाच एक भाग बनेल. म्हणजेच Zomato, Swiggy किंवा MakeMyTrip यांसारख्या कंपन्या आपल्या ॲपमध्ये AI आधारित फीचर्स आणतील, ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक जलद, सोपा आणि वैयक्तिक होईल.

follow us