तांत्रिक चूक अन् महिला करोडपती; एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच रंजक स्टोरी
एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच रंजक आहे. सीता देवी यांची प्रामाणिकता आणि डिजिटल युगातील एक तांत्रिक गोंधळ यामुळे ही चर्चा देशभर रंगलीय.
An interesting story like a movie plot : यूपीच्या मैनपुरी जिल्ह्यात घडलेली ही हृदयस्पर्शी आणि थक्क करणारी घटना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच रंजक आहे. सीता देवी यांची प्रामाणिकता आणि डिजिटल युगातील एक तांत्रिक गोंधळ यामुळे ही चर्चा देशभर रंगलीय. त्याचं झालं असं की, उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील देवगंज गावात राहणाऱ्या सीता देवी 2 वर्षांपूर्वी घेतलेल्या म्हशीच्या कर्जाचा हप्ता आणि बॅलन्स तपासण्यासाठी एटीएममध्ये गेल्या होत्या. पण स्क्रीनवर जो आकडा दिसला, त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
खात्यात तब्बल 9 कोटी 99 लाख 49 हजार 588 रुपये जमा असल्याचे दिसत होते. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीसाठी हा आकडा स्वप्नवत होता, पण सीता देवींनी डगमगून न जाता ‘हा पैसा आपला नाही’ हा विचार पक्का केला. एकीकडे लोक फसवणूक करून पैसे मिळवण्याच्या मागे असतात, तिथे सीता देवींनी आपल्या मुलाच्या मदतीने या घटनेचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे पैसे माझे नाहीत, ज्याचे असतील त्याने ते परत घ्यावे, मला यातला एक रुपयाही नको.
अधिकाऱ्यांचे वाईफ स्वॅपिंग अन्… वडेट्टीवारांचे दावे तर पुरावे द्या म्हणत बावनकुळे भडकले
हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांपर्यंत याची दखल घेतली गेली. दरम्यान चैत्र नवरात्रीच्या सुट्ट्यांमुळे बँका बंद होत्या, पण सोशल मीडियावरील गदारोळानंतर बँकेचे अधिकारी तपासासाठी सीता देवींच्या घरी पोहोचले. तपासात समोर आले की, खात्यात कोणताही संशयास्पद व्यवहार झालेला नव्हता. प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात फक्त 61 हजार 512 रुपये होते. एटीएममध्ये दिसणारी ती कोट्यवधींची रक्कम म्हणजे एक तांत्रिक चूक होती. सीता देवींच्या ‘लोन अकाउंट’वर असलेल्या ‘लियन’ या तांत्रिक प्रक्रियेमुळे सिस्टिममध्ये ती मोठी रक्कम दिसत होती.
आजच्या काळात जिथे पैशासाठी नाती तुटतात, तिथे सीता देवींनी दाखवलेली ही तटस्थता कौतुकास्पद ठरली. तपासाअंती अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की खात्यातून एकही रुपया काढला गेला नव्हता. बँकेच्या चुकीमुळे स्क्रीनवर कोट्यवधी रुपये दिसत असूनही, सीता देवींनी जो प्रामाणिकपणा दाखवला, त्याची चर्चा आज संपूर्ण देशभर होत आहे. ‘इमान विकले जात नाही’ हेच सीता देवींनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं.