बजरंग पुनियाने निर्णय खरा केला; मोदींच्या घराबाहेर फुटपाथवरच ठेवला ‘पद्मश्री’ पुरस्कार

बजरंग पुनियाने निर्णय खरा केला; मोदींच्या घराबाहेर फुटपाथवरच ठेवला ‘पद्मश्री’ पुरस्कार

Bajrang Puniya : लैंगिक शोषणाचे आरोप असलेले कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan singh) यांच्या जवळच्याच व्यक्तीची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने देशातील कुस्तीपटूंकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Mailk) कुस्तीला अलविदा केल्यानंतर आता कुस्तीपटू बजरंग पुनियानेही (Bajrang Punia) पद्मश्री पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना माघारी केला आहे. पुरस्कार परत देण्याची घोषणा केल्यानंतर बजरंग पुनिया पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी गेला. निवासस्थानावर पोलिसांनी रोखल्याने घराजवळील फुटपाथवरच बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार ठेवला आहे.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह अध्यक्ष होताच कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली होती. लैंगिक शोषणाचा आरोप करत या तिघांनीही कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान, संजय सिंह यांनी कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकल्यानंतर साक्षी मलिकने कुस्तीला अलविदा केला. तर कुस्तीपटू बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्काराचा त्याग करण्याचा मोठा निर्णय घेतला. “मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करणार”, असं बजरंग पुनियाने एक्सवर पोस्ट शेअर करीत घोषणा केली होती.

Satyashodhak : फुले दाम्पत्याची संघर्षमय गाथा झळकणार मोठ्या पडद्यावर; ‘सत्यशोधक’ चा ट्रेलर लॉन्च!

पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर काहीच वेळात बजरंग पुनिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार परत करण्यासाठी निघाला. परंतु, पीएम आवासाजवळ तिथल्या सुरक्षारक्षकांनी बजरंगला रोखलं. बजरंग पंतप्रधानांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे त्याने पंतप्रधानांच्या घराजवळच्या पदपथावर (फूटपाथ) त्याचा पद्मश्री पुरस्कार ठेवला आणि तिथून निघून गेला आहे.

संजय सिंह यांच्या निवडीनंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत साक्षी मलिक म्हणाली, आम्ही चाळीस दिवस रस्त्यावर आंदोलन केले आहे. देशातील लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला होता. परंतु बृजभूषण शरण सिंह यांच्या व्यावसायिक भागीदार आणि निकटवर्तीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष निवडला जात आहे. त्यामुळे मी कुस्ती सोडत आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचेही मी आभार मानते, असं मलिकने जाहीर केलं आहे. त्यानंतर लगेचच बजरंग पुनियानेही आपल्याला मिळालेला पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामुळे आता कुस्ती महासंघाच्या निवडीवरुन देशात कुस्तीप्रेमींमध्येही नाराजी व्यक्त केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube