होर्मुझ सामुद्रधुनीबाबत पुढच्या काही तासांत मोठी घडामोड? मार्को रुबियो यांच्या विधानाने युद्ध थांबण्याच्या चर्चांना वेग
इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत आता काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Big developments regarding the Strait of Hormuz : जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून एक महत्त्वपूर्ण संकेत देण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी नवी दिल्लीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत रुबियो यांनी केलेल्या एका विधानाने आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत पुढच्या काही तासांमध्ये चांगली बातमी ऐकायला मिळेल, असे वक्तव्य रुबियो यांनी माध्यमांसमोर केले. विशेष म्हणजे, त्यांनी ही शेवटची बातमी नसेल असेही स्पष्ट केले. त्यामुळे इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत आता काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणच्या आण्विक कार्यक्रमावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता. त्यातच होर्मुझ सामुद्रधुनी हा जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने जगभरातील अर्थव्यवस्थांचे लक्ष या भागाकडे लागले आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने येथे निर्माण होणारा कोणताही तणाव जागतिक बाजारपेठांवर थेट परिणाम करतो.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच इराणसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेबाबत मोठे विधान केले होते. चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. काही मुद्द्यांवर अजून चर्चा बाकी असली तरी सकारात्मक प्रगती होत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर लगेचच रुबियो यांनी दिलेल्या संकेतांमुळे युद्ध थांबण्याच्या शक्यता अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.
मार्केट कोसळणार हे निश्चित! रॉबर्ट कियोसाकींचा इशारा; सोनं 3 लाख रुपये तोळा, चांदी 5 लाख रुपये किलोवर जाणार?
दरम्यान, भारत-अमेरिका संबंधांवर बोलताना रुबियो यांनी भारताचे विशेष कौतुक केले. भारत आणि अमेरिकेचे संबंध अतूट आहेत. दोन्ही देश केवळ धोरणात्मक भागीदार नाहीत, तर लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणारे मजबूत सहकारी आहेत, असे ते म्हणाले. दोन्ही देशांनी दहशतवादाचे गंभीर परिणाम अनुभवले आहेत. त्यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याच्या मुद्द्यांवर आमचे विचार मोठ्या प्रमाणात समान आहेत. भारत हा अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या राजनैतिक भागीदारांपैकी एक आहे, असेही रुबियो यांनी नमूद केले.
भारताची वाढती जागतिक भूमिका अधोरेखित करताना त्यांनी म्हटले की, भारत आता केवळ प्रादेशिक शक्ती राहिलेला नाही. जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची क्षमता भारतामध्ये आहे. ऊर्जा सुरक्षा, पुरवठा साखळी आणि आर्थिक स्थैर्य यामध्ये भारताची भूमिका भविष्यात अधिक निर्णायक ठरणार आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या प्रश्नावर भारत आणि अमेरिकेमध्ये चांगले समन्वय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेच्या काळात भारत-अमेरिका सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.
दरम्यान, रुबियो यांच्या चांगली बातमी या विधानानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. इराणकडून तेलवाहतुकीवरील निर्बंध शिथिल होणार का, युद्धविराम जाहीर होणार का, किंवा अमेरिका-इराण शांतता कराराच्या दिशेने मोठी घोषणा होणार का, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.