मी पुण्यातच आहे; ओमराजे निंबाळकरांनी दिल्लीतील बैठकींच्या चर्चांना पूर्णविराम दिला, पण राजकीय भूमिका गुलदस्त्यात
मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही. तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत, असं खा. ओमराजेंनी स्पष्टपणे सांगितलं.
MP Omraje Nimbalkar clarified his stance : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. बाहेर पडत पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा केले होता. न्यायालयाने देखील शिंदेंची शिवसेनाच शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं होत. आता पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना फुटली असून सहा खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात वातावरण तापलं आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह दिल्लीत देखील राजकीय हालचाली सुरू असल्याचं बोलल जात आहे. आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या चर्चांवर प्रतिक्रिया दिली.
यावेळी संजय राऊत यांनी पक्षफोडीच्या प्रयत्नांवर जोरदार हल्लाबोल करत, मागे जे झालं त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाला तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेनाही गप्प बसणार नाही. जो राडा व्हायचा तो होईल. ही XXगिरी आणि नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. दरम्यान, संपर्कात नसल्याचं सांगितल्या जाणाऱ्या खासदारांपैकी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला. दिवसभर ते दिल्लीत असल्याच्या आणि काही महत्त्वाच्या राजकीय बैठका घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच माजी मंत्री तानाजी सावंत त्यांना दिल्लीला घेऊन गेल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.
ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही म्हणणाऱ्या ओमराजेंची शेवटची सही?; वाचा, लेट्सअप खबरबातचा खास रिपोर्ट
मात्र ओमराजे निंबाळकर यांनी या सर्व चर्चांचं खंडन केलं. मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही. तानाजी सावंत मला दिल्लीला घेऊन गेलेले नाहीत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मात्र, तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबतच आहात का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळल्याने त्यांच्या भूमिकेबाबतचं गूढ कायम राहिलं आहे. ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि निष्ठावंत खासदार मानले जातात. त्यामुळे त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास तो ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचा मोठा वाटा राहिला आहे. 2006 मध्ये वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर अवघ्या 22 व्या वर्षी त्यांना राजकारणात उतरावं लागलं.
त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर आमदारकी मिळवली आणि दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. शांत, संयमी आणि तळागाळातील जनतेशी घट्ट नाळ जोडलेला नेता अशी त्यांची ओळख आहे. दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय पाटील, ओमराजे निंबाळकर आणि संजय देशमुख हे खासदार ठाकरे गटाची साथ सोडू शकतात, अशा चर्चांना जोर आला आहे. मात्र, स्वतः ओमराजे निंबाळकर यांनी आपण दिल्लीत नसून पुण्यात असल्याचं स्पष्ट केल्यामुळे या राजकीय चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. तरीही त्यांनी आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत मौन बाळगल्याने ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांवरचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. आगामी काही दिवसांत या घडामोडींना कोणतं वळण मिळतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.