बिहारमध्ये राडा! पोलिसांचा भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; एकाचा मृत्यू, खासदाराचे डोके फुटले

बिहारमध्ये राडा! पोलिसांचा भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज; एकाचा मृत्यू, खासदाराचे डोके फुटले

Bihar Politics : बिहार विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला. भाजप आमदारांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांच्या या लाठीमारात एका भाजप नेत्याचा मृत्यू झाल्याचा दावा भाजप नेते सुशील मोदी यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पटना शहरातील डाक बंगला परिसरात विधानसभेला घेराव घालण्यासाठी निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी अश्रूधुराचाही मारा केला.

बिहारमधील शिक्षक भरती आणि बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाजप नेत्यांनी आज विधानसभेवर मार्च काढला. या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते सहभागी झाले होते. या मार्चला रोखण्यासाठी पोलिसांनी डाक बंगला परिसरात कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. तसेच आंदोलकांवर अश्रुधूराचा मारा केला.

या लाठीमारात महाराजगंजचे खासदार जनार्दन सिंह सिग्रीवाल यांचे डोके फुटले. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच अन्य जखमी कार्यकर्त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले. कार्यकर्तेच नाही तर काही पत्रकारही जखमी झाले आहेत. महिला कार्यकर्त्यांवरही पोलिसांनी लाठीमार केल्याचे सांगण्यात येत आहे.

शिक्षक भरती, भ्रष्टाचार आणि बिघडलेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर भाजपने आंदोलन केले. या आंदोलनात लोकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. गांधी मैदान ते विधानभवन असा मार्च आयोजित करण्यात आला होता. यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरी देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

नितीशकुमार उत्तर द्या-पासवान 

भाजप नेत्याचा मृत्यू झाल्याने कार्यकर्ते संतापले असून त्यांनी यासाठी बिहार सरकारला जबाबदार धरले आहे. जहानाबादच्या कार्यकर्त्याचा हा मृत्यू नाही तर बिहार सरकारनेच हा खून केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे लोक जनशक्ती पार्टीचे ( रामविलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवान यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत नितीश कुमार यांना घेरले आहे. नितीश कुमार यांच्या सरकारच्या काळात जर लाठीमारात जर कुणाचा मृत्यू होत असेल तर ही जबाबदारी तुमची आहे. याचे उत्तर द्या, असे पासवान म्हणाले.

दोन आमदारांना सभागृहातून बाहेर काढले

दरम्यान, विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजप आमदारांनी गदारोळास सुरुवात केली. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. भ्रष्टाचार, रोजगार आणि शिक्षक नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत सभागृहाची वेल गाठली. भाजपने विधानसभेतून सभात्याग केला. नंतर भाजप आमदार जीवेश मिश्रा आणि शैलेंद्र यांना सभापतींच्या सूचनेवरून सभागृहाबाहेर हाकलण्यात आले. मार्शल्सने या दोन्ही आमदारांना सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा यांच्या नेतृत्वात भाजपाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube