राज ठाकरेंच्या हाती पुन्हा निराशाच; एक्झिट पोलनुसार मनसेचं इंजिन यार्डातच; पुनरागमनाची आशा फोल

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मनसेकडून अपेक्षित असलेली पुनरागमनाची आशा या निवडणुकीतही फोल ठरल्याचं चित्र एक्झिट पोलमधून स्पष्ट.

  • Written By: Published:
Untitled Design (259)

Raj Thackeray faces disappointment again : मुंबई महापालिकेसाठी पार पडलेल्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती यंदाही निराशाच येण्याची चिन्हं दिसत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मनसेकडून अपेक्षित असलेली पुनरागमनाची आशा या निवडणुकीतही फोल ठरल्याचं चित्र एक्झिट पोलमधून स्पष्ट होत आहे. विविध नामांकित संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये मुंबई महापालिकेतील सत्ता संघर्ष मुख्यतः भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाच्या भोवती फिरताना दिसतो.

मात्र या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये मनसेची भूमिका अत्यंत मर्यादित असल्याचं चित्र समोर आलं आहे. आजतक ॲक्सिसच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसे यांची एकत्रित आकडेवारी मांडण्यात आली असली, तरी त्यामध्ये मनसेचा स्वतंत्र वाटा अत्यल्प असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जात आहे. एकेकाळी मुंबईच्या राजकारणात ‘मराठी मुद्दा’ आणि आक्रमक शैलीमुळे प्रभाव निर्माण करणाऱ्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत तो प्रभाव पुन्हा मिळवण्यात अपयश आल्याचं दिसून येत आहे.

विशेषतः मुंबईतील मध्यवर्ती आणि उपनगरातील अनेक प्रभागांमध्ये मनसे उमेदवारांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. मोठ्या पक्षांमधील थेट लढती, युती-आघाड्यांचे गणित आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कमकुवतपणा याचा थेट फटका मनसेला बसल्याचं चित्र आहे. राजकीय जाणकारांच्या मते, मनसेसमोर यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट राजकीय भूमिका, ठोस आघाडी धोरण आणि व्यापक संघटनात्मक बांधणीचा अभाव प्रकर्षाने जाणवला. प्रचारादरम्यान पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सभा आणि भाषणांच्या माध्यमातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला, तरी तो प्रयत्न मतांमध्ये रूपांतरित होताना दिसत नाही.

Exit Poll : मतदान संपलं, धाकधूक वाढली; पुणे-मुंबईत कुणाचा झेंडा? एक्झिट पोलनं टेन्शन वाढवलं…

मुंबई महापालिका ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून, ती राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी मानली जाते. अशा निवडणुकीत मनसेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार, मनसे पुन्हा एकदा निर्णायक भूमिकेपासून दूरच राहिल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, हे सर्व अंदाज एक्झिट पोलवर आधारित असून, मुंबई महापालिकेचं अंतिम चित्र उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्याच्या आकडेवारीवरून पाहता, मुंबईत मनसेच्या राजकीय वाटचालीपुढे अजूनही मोठं आव्हान उभं असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मनसेच्या हाती अपेक्षित यश न आल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे मनसेचं पुढे काय? एकेकाळी मुंबईच्या राजकारणात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणाऱ्या मनसेसमोर आज अस्तित्व आणि प्रभाव टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मराठी अस्मिता, स्थानिक प्रश्न आणि आक्रमक राजकारण या मुद्द्यांवर उभी राहिलेली मनसे गेल्या काही वर्षांत बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये मागे पडताना दिसत आहे.

दरम्यान निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबत भविष्यवाणी केली होती. उद्धव ठाकरेंसोबत युतीत राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होईल. ही माझी भविष्यवाणी आहे असं भाकीत फडणवीसांनी वर्तवले होते. त्यामुळे एक्झिट पोलनुसार फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरतेय असं दिसते. मात्र प्रत्यक्ष निकालात मनसे काय कामगिरी करते हे काही तासांनी स्पष्ट होणार आहे.

धुळ्यात मतदानाच्या दिवशीच मोठा गोंधळ; मतदान केंद्रात ठेवलेल्या ईव्हीएम मशीनच्या तोडफोडीने खळबळ

राजकीय विश्लेषकांच्या मते, मुंबई महापालिकेत मनसेसमोर तीन प्रमुख पर्याय खुले आहेत. पहिला पर्याय म्हणजे पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी. स्थानिक पातळीवर सक्रिय शाखा, युवा कार्यकर्त्यांना संधी आणि वॉर्डनिहाय ठोस काम या माध्यमातून पुन्हा जनाधार निर्माण करण्याची गरज आहे. दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे स्पष्ट राजकीय भूमिका. गेल्या काही काळात मनसेची भूमिका कधी सत्ताधारी, कधी विरोधक, तर कधी स्वतंत्र अशी भासत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. आगामी काळात कोणत्याही पक्षासोबत युती करायची की स्वतंत्र राजकारण करायचं, याबाबत स्पष्ट दिशा ठरवणं मनसेसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

तिसरा आणि कदाचित सर्वात निर्णायक मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांची राजकीय रणनीती. सभा, भाषणं आणि मुद्देसूद मांडणीच्या जोरावर वातावरण निर्मिती करण्यात ते यशस्वी ठरतात, मात्र ती लाट मतपेटीपर्यंत पोहोचवण्यात पक्षाला सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे आता केवळ भाषणांपेक्षा संघटन, स्थानिक नेतृत्व आणि दीर्घकालीन राजकीय नियोजनावर भर द्यावा लागणार आहे.

अंतिम निकालानंतर मनसेकडून आत्मपरीक्षण, संघटनात्मक बदल किंवा नव्या राजकीय समीकरणांची घोषणा होते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईनंतर मनसेचं पुढचं पाऊल काय असेल, हा प्रश्न केवळ मनसेपुरता मर्यादित नसून, तो राज्याच्या राजकारणासाठीही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.

follow us