ममता बॅनर्जींना पुन्हा धक्का; फलता विधानसभा मतदारसंघात भाजपचे पांडा विजयी

आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपचे देबांग्शु पांडा आघाडीवर होते. प्रत्येक फेरीनंतर त्यांची आघाडी वाढत गेली आणि अखेर त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

News Photo   2026 05 24T192107.872

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील फलता विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देबांग्शु पांडा यांनी मोठा विजय मिळवला आहे. ही जागा यापूर्वी तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला होती, मात्र आता यावर भाजपने झेंडा फडकवला आहे.

या मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले होते, त्यामुळे संपूर्ण मतदानच रद्द करून पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. फलता विधानसभा मतदारसंघात पुनर्मतदानानंतर झालेल्या मतमोजणीत भाजपने तब्बल एक लाख मतांच्या फरकाने विजय मिळवत टीएमसीला मोठा धक्का दिला आहे. या निकालानंतर पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मतांची चोरी झाल्याचा दावा केला असून केंद्रीय सुरक्षा दलातील काही जवान भाजपचे एजंट बनून मतमोजणी केंद्रात गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

2002 प्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र, बंगालमध्ये त्याची सुरुवात; सपकाळांची टीका

फलता विधानसभा मतदारसंघ हा दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात असून तो टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे हा भाग टीएमसीचा बालेकिल्ला मानला जात होता. 29 एप्रिल रोजी येथे पहिल्यांदा मतदान झाले होते. मात्र मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड, बूथ कॅप्चरिंग आणि मतदारांना धमकावल्याचे गंभीर आरोप झाले. परिस्थिती इतकी बिघडली की निवडणूक आयोगाने संपूर्ण मतदारसंघातील मतदान रद्द केले. त्यानंतर 21 मे रोजी सर्व 285 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे मतदान शांततेत पार पडले आणि 88 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली होती. आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच भाजपचे देबांग्शु पांडा आघाडीवर होते. प्रत्येक फेरीनंतर त्यांची आघाडी वाढत गेली आणि अखेर त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

दुसऱ्या क्रमांकावर सीपीएमचे संभू नाथ कुर्मी राहिले, तर काँग्रेसचे अब्दुर रज्जाक मोल्ला तिसऱ्या क्रमांकावर होते. टीएमसीचे जहांगीर खान चौथ्या स्थानावर राहिले. विशेष म्हणजे पुनर्मतदानाआधीच जहांगीर खान यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, फलता मतदारसंघातील हा निकाल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपने एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा निकाल ममता बॅनर्जी आणि टीएमसीसाठी मोठा राजकीय इशारा मानला जात आहे. आता आगमी काळात टीएमसी कसे पुनरागमन करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us