समर्थ रामदास नसते, तर शिवराय झाले नसते; मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वादग्रस्त विधान
Dharmendra Pradhan : देशातील अनेक नेते हे संत आणि महापुरूषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात गेली. आता पुन्हा एकदा भाजप नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते, असं वक्तव्य केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केलं. गुजरातमधील नर्मदा येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळं शिवप्रेमी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चांगलेच संतापले.
मराठा आरक्षण : खासदार हेमंत पाटील यांचा राजीनामा; दिल्लीत उपोषणही करणार!
सविस्तर वृत्त असं की, गुजरातच्या शालेय शिक्षण विभागाने नर्मदा येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. आयोजित केलेल्या या कार्यक्रमात धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. यावेळी बोलतांना प्रधान म्हणाले, समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते. शिवाजी बनवण्याची फॅक्टरी असलेले सर्व समर्थ गुरू इथे बसले आहेत. प्रधान यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी आक्षेप घेतला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हणाले की, हे लोक जाणीवपूर्वक आणि सातत्याने असा वाद सुरू ठेवतात. बाबासाहेब पुरंदेर यांनी सर्वात् आदी असा विषय मांडला होता. परंतु, शेवटी त्यांनी या प्रकरणी माफी मागितली आणि मान्य केलं की, रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते.
भानुसे म्हणाले, रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे धर्मेंद्र प्रधान सांगत असतील तर आमचे त्यांनी तीन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी १८ देशांतून लोक आले होते. मग राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज रामदासांना कसे विसरले? दुसरा प्रश्न- जर रामदास गुरु होते तर शिवाजी महाराजांनी गागा भट्ट यांना राज्याभिषेकासाठी का बोलावले? तिसरा प्रश्न- जेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी आणि तथाकथित प्रवृत्तीच्या लोकांनी विरोध केला, तेव्हा रामदासांनी त्या लोकांचा विरोध का केला नाही? तेव्हा रामदास कुठे होते? असे सवाल भानुसने यांनी केले.
ते म्हणाले, शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा इतिहासात पुरावा नाही. केवळ एकच पत्र प्राप्त झाले आहे. ज्यामध्ये रामदासांनी शिवाजी महाराजांकडे मठासाठी देणगी मागितली होती.
याआधी ‘या’ नेत्यांनी केलं बेताव वक्तव्य
भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होतो. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान केलं होतं. त्यामुळं शिवप्रेमींनी त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केली होती.