CM शिंदे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर; जागा वाटप अन् मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हाणार?
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. आज (शनिवार) ते इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर उद्या (रविवारी) ते नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) देखील उद्या (रविवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. (Cm Eknath Shinde and Dcm Devendra Fadavis on 3 days Delhi visit)
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात पडद्यामागे अनेक गोष्टी घडत आहेत. यात प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आणि जागा वाटपाचा मुद्दा यावर चर्चा होत असल्याचा बातम्या आहेत. शिंदेंच्या आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपवर दबाव असल्याचे बोलले जात आहे. मागील ९ ते १० महिन्यांपासून मंंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आमदारांमध्येही अस्वस्थता पसरली असल्याचे चित्र आहे.
याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ४८ पैकी तब्बल २२ जागांवर दावा सांगितला आहे. इतक्या जागा कशा द्यायचा हा भाजपसमोरील मोठा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच भाजप-शिंदे गटात जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात शिंदे गटाने भाजपकडे २२ जागांची मागणी केली असून या प्रस्तावाला भाजपने नकार दिल्याचे समजते. जागावाटपाबाबत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे जे आधीचे सूत्र होतं ते कायम राहिल अशी आमची अपेक्षा आहे, असं प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले.
जागा वाटप अन् मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडं गंगेत न्हाणार?
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात या दोन्ही कळीच्या मुद्द्यांचं घोडं गंगेत न्हाणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. याशिवाय या दौऱ्यादरम्यान शिंदे-फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. यात जागावाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
दिल्लीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, नीती आयोगाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने मांडणार आहे. तसेच संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी देखील राज्यपालांना डावलून अनेक राज्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या इमारतींचे उद्घाटन झालेली आहेत. फक्त मोदींना विरोध करायचा म्हणून या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात येत असून ते सर्वस्वी चुकीचे आहे असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.