‘इंडिया’त वादाची ठिगणी! केजरीवालांना CM होऊ देणार नाही; कॉंग्रेस नेत्यांनी ठणकावून सांगितलं…

‘इंडिया’त वादाची ठिगणी! केजरीवालांना CM होऊ देणार नाही; कॉंग्रेस नेत्यांनी ठणकावून सांगितलं…

दिल्ली : पुढीलवर्षी लोकसभा निवडणुकीत (Loksabha) सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाखालील एनडीएला कडवी झुंज देण्यासाठी तब्बल 26 विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या विरोधी पक्षांनी त्यांच्या युतीला I.N.D.I.A. असे नाव दिले. आगामी निवडणुकीत भाजपचा (BJP) पराभव करण्याचा दावा इंडिया आघाडीचे नेते करत आहेत. मात्र, दिल्लीत आघाडीच्या बुरूजाला तडा जाऊ लागल्याचं चित्र आहे.

नुकतीच दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आदी ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या बैठकीनंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. तसेच राजधानीत तीन प्रमुख पक्षांचे वर्चस्व आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा समावेश आहे. मात्र, काँग्रेस सर्व जागांवर आम आदमी पक्षाचा पराभव करून निवडणूक लढवणार असल्याने इंडिया आघाडीत फूट पडल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचा हा निर्णय आघाडीसाठी मोठा धक्का आहे. दिल्लीतील सर्व जागांवर कॉंग्रेसने एकट्याने लढण्याचा निर्णय घेतल्यानं वाद होण्याची शक्यता आहे.

अजितदादांनी घेतली नवाब मलिकांची भेट, दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे-फडणवीसांना चालणार का? 

दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युती करून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर काँग्रेस नेते अनिल चौधरी म्हणाले, काँग्रेस पक्ष सध्या संघटन मजबूत करून लढणार आहे. आम आदमी पार्टी किंवा युतीबाबत आमची चर्चा झाली नाही. आम्ही आमचा मार्ग निवडला आहे. पोलखोल यात्रेच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल सरकारची खरी धोरणे एक्सपोज करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला. मद्य घोटाळ्यापासून ते त्यांच्यावर झालेल्या अनेक कारवाया या आमच्या लोकांनी केलेल्या तक्रारीवरून झाल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही जिंकू. तसेच, 2025 मध्ये अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करू.

काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया यांच्या उपस्थितीत आमची बैठक तीन तास चालली. या बैठकीत दिल्लीतील सातही लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. या सर्व जागांवर आम्ही निवडणूक लढवू. निवडणुकीला अवघे सात महिने उरले असून, सर्व कार्यकर्त्यांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तर आपच्या प्रवक्त्या प्रियंका कक्कड म्हणाल्या की, दिल्लीत आघाडी होणार नसेल तर ‘इंडिया’च्या आघाडीत राहण्यात काही अर्थ नाही. तो वेळेचा अपव्यय आहे. मुंबईत होणाऱ्या ‘भारत’ आघाडीच्या बैठकीत सहभागी व्हायचे की नाही याबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेईल, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, सर्व विरोधी पक्ष एकजुटीने भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा दावा करत आहेत.मात्र जागावाटपाबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र, सध्या तरी दिल्लीत या आघाडीत फूट पडल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube