Delhi Elections : ‘सपा’नंतर CM ममता बॅनर्जींचाही ‘आप’ला पाठिंबा; केजरीवाल म्हणाले, ‘थॅंक्यू दीदी…’
Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा (Delhi Elections) निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं. आम आदमी पार्टीसाठी (Aam Aadmi Party) अस्तित्वाची तर भाजप आणि काँग्रेससाठी (Congress) प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत.
समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांची कोपरगावला धावती भेट; आमदार आशुतोष काळेंनी केले स्वागत
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया साइट X वर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी ममता बॅनर्जींचे आभार मानलेत. त्यांनी लिहिलं की, तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. मी वैयक्तिकरित्या ममता दीदींचा आभारी आहे. धन्यवाद दीदी, तुम्ही नेहमीच चांगल्या आणि वाईट काळात आम्हाला साथ दिली, असं केजरीवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
TMC has announced support to AAP in Delhi elections. I am personally grateful to Mamta Didi. Thank you Didi. U have always supported and blessed us in our good and bad times.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 8, 2025
केजरीवाल यांच्या ट्विटनंतर तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार डेरेक ओब्रायन यांनीही आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं म्हटलं.
सपाचा देखील आपला पाठिंबा…
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांच्या ‘आप’ला पाठिंबा जाहीर केला. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांचेही आभार मानले होते.
इंडिया आघाडीत बिघाडी?
हरियाणामध्ये समाजवादी पक्षाला सोबत घेण्यास काँग्रेसने नकार दिला होता. यानंतर दिल्लीतही इंडिया आघाडी दुभंगल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. मात्र, त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
यानंतर इंडिया आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, काहीच दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीची मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर नेतृत्व करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान
सत्ताधारी आपने 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत अनुक्रमे 67 आणि 62 जागा जिंकल्या होत्या. आता आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रिक करण्याचे आपचं लक्ष्य आहे. 70 सदस्यीय दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे.