केजरीवाल अडचणीत: उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांसह आणखी एका मंत्र्याचा राजीनामा
नवी दिल्ली : मद्य धोरणाशी संबंधित प्रकरणात केजरीवाल सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना सोमवारी अटक झाली होती. तसेच आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) हे तुरुंगात असतानाही पदावर होते. यावरुन विरोधी पक्षांनी केजरीवाल सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.
यानंतर आप (AAP) कार्यालयात मोठ्या घडामोडी घडल्यानंतर मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे.
मनीष सिसोदिया यांच्याकडे अनेक विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यानंतर मनीष सिसोदिया (Manish Sisodia) त्यांच्या विभागाचे काम पाहत होते. मनीष सिसोदिया यांच्याकडे दिल्ली सरकारच्या 33 पैकी 18 विभागांची जबाबदारी होती. सत्येंद्र जैन नऊ महिन्यांपासून तुरुंगात आहेत.
दावोसच्या दौऱ्यासाठी 40 कोटींची उधळपट्टी कशाला?, अजित पवारांनी सुनावले खडेबोल
या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनोज तिवारी ट्वीट करत म्हणाले आहे की, ”सुप्रीम कोर्टाने फाटकारल्यानंतर आम आदमी पक्षाची झोप उडाली आहे. शेवटी मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. केजरीवाल जी तुम्ही नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राजीनामा द्यायला हवा.”
यावर कपिल मिश्रा यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दिल्लीची जनता जिंकली, भ्रष्ट मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला. तुरुंगातून सरकार चालवण्याचे पाप थांबावे लागले. भ्रष्ट मंत्र्यांना वाचवण्याचे केजरीवालांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.”
भाजपच्या आरोपांवर दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपाल राय म्हणाले, यामुळे दिल्ली सरकारचे काम थांबणार नाही आणि भाजप आपल्या योजनेत यशस्वी होणार नाही.
राजेंद्र पाल गौतम, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यासह दिल्लीतील एकूण तीन मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षी राजेंद्र पाल गौतम यांनी एका वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला होता.