दिल्लीत मोठा राजकीय भूकंप, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन् देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी; पडद्यामागे काय शिजतंय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 25T161631.701

Devendra Fadnavis’s visit to Delhi : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे देशाचे लक्ष दिल्लीकडे लागले होते. जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने केंद्र सरकारवरील दबाव वाढवला असतानाच शनिवारी मोठी राजकीय घडामोड घडली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजधानीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील अचानक दिल्लीकडे रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीत राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण आठवडाभर कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा संसदेत देखील गाजत होता. दुसरीकडे, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि विविध संघटनांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.

शनिवारी होणारी कोणतीही चर्चा किंवा वाटाघाटी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे केंद्र सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा राजकीय निर्णय मानला जात आहे.

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन सुरूच राहणार, अभिजित दीपक यांच्या अजून 2 मोठ्या मागण्या

दरम्यान, या घडामोडी सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या दिल्ली दौर्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी केंद्रातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक, राज्याशी संबंधित प्रश्न किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीस यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

पुढील चर्चेकडे देशाचे लक्ष

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत आंदोलकांची पुन्हा चर्चा होणार आहे. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या उर्वरित मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकारकडून सकारात्मक आश्वासने मिळाल्यास आंदोलनाची दिशा बदलू शकते, तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राजीनाम्यानंतर निर्माण झालेली नवी राजकीय परिस्थिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा आणि आंदोलकांसोबत होणारी पुढील चर्चा यामुळे राजधानीतील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. आगामी काही तासांत होणारे निर्णय आंदोलनाच्या पुढील वाटचालीसह राष्ट्रीय राजकारणासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत.

follow us