West Bengal Politics : पश्चिम बंगालमध्येही शिंदे फॉर्म्युला? दिदींच्या TMC त फुटीचे संकेत
West Bengal Politics : नुकतंच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.
West Bengal Politics : नुकतंच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. निकालाच्या काही दिवसांनंतर खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला तर आतापर्यंत अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. तर दुसरीकडे आता टीएमसीमध्ये फुटीचे संकेत मिळत असल्याने पश्चिम बंगालमध्येही आता महाराष्ट्र सारखा फॉर्म्युला भाजपकडून तयार करण्यात येत आहे का? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पराभवाचे कारण शोधण्यासाठी टीएमसीकडून तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी मे रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत 10 आमदार गैरहजर राहिले होते तर 19 मे रोजी बोलवण्यात आलेल्या बैठकीत 35 आमदार गैरहजर राहिले होते तर 31 मे रोजी झालेल्या तिसऱ्या बैठकीत 80 पैकी 60 आमदार गैरहजर राहिल्याने ममता बॅनर्जी यांचा पक्षात फुटीचे संकेत मिळत आहे.
तर दुसरीकडे पक्षाचे प्रवक्ते विश्वजित देव यांनी देखील आपला पदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर शांतनू सिंग, अभिजीत मजुमदार, काकोली घोष आणि अरूप चक्रवर्ती यांनीही आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच डायमंड हार्बर येथील 8 नगरसेवकांनीही राजीनामे दिले आहेत. चंदननगर येथील 30, भाटपारा येथील 30, गारुलिया येथील 18, हलीसहर येथील 16, उत्तर बॅरकपूर येथील 15 आणि कांचरापारा येथील 14 नगरसेवकांनी यापूर्वीच राजीनामे दिले आहेत.
या राजीनाम्यांव्यतिरिक्त, ममता बॅनर्जी यांनी उलुबेरियाचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी आणि एंटालीचे आमदार संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली. या दोन्ही व्यक्ती पक्षविरोधी कारवायांमध्ये सक्रियपणे सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. आमदारांची अनुपस्थिती, काहींची पक्षातून हकालपट्टी आणि राजीनाम्यांची सततची मालिका यावरून हे निश्चितपणे दिसून येते की, सध्याच्या घडीला टीएमसीमध्ये (TMC) सर्व काही ‘आलबेल’ नाही.
‘न्यूज18 इंडिया’च्या एका वृत्तानुसार, कोलकाता येथील ‘आमदार निवास’मध्ये (MLA Hostel) टीएमसीच्या नेत्यांची एक गुप्त बैठक यापूर्वीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार तसेच अनेक नाराज नेते उपस्थित होते आणि या बैठकीत टीएमसीचे भविष्य, संघटनात्मक बदल व नवीन राजकीय पर्याय यांसारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, पक्षाला कमकुवत करण्याच्या उद्देशाने रचल्या जाणाऱ्या कारस्थानांविषयीचे आरोप खुद्द ममता बॅनर्जी यांनीच केले आहेत. पक्षाला खिळखिळे करण्यासाठी आणि त्यात फूट पाडण्यासाठी सध्या एक सुनियोजित कट रचला जात असल्याचा दावा त्या करत आहेत. ममता यांचे हेच विधान असे सूचित करते की, तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे आणि टीएमसीमध्ये अखेरीस फूट पडू शकते, या चिंतेने त्या स्वतःही निःसंशयपणे ग्रासलेल्या आहेत.
या घडामोडींची तुलना राजकीय निरीक्षकांनी महाराष्ट्रातील परिस्थितीशी करण्यास सुरुवात केली आहे. जिथे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी एक मोठा राजकीय भूकंप घडवून आणला होता. त्यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली आणि अनेक आमदारांना सोबत घेऊन, संपूर्ण पक्षावर प्रभावीपणे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदारांना घेऊन मुख्यमंत्री आणि पक्षावर दावा केला होता. सध्या शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून लवकरच याबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे.