Muzaffarnagar school slap video : Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Muzaffarnagar school slap video : Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्याविरुद्ध मुझफ्फरनगर शाळेतील वादग्रस्त व्हिडीओमधील मुलाची ओळख उघड केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू दत्त यांच्या तक्रारीनंतर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, 2015 च्या कलम 74 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR lodged against Alt News co-founder Mohammad Zubair for ‘revealing’ identity of student)

मुझफ्फरनगरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संजीव सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू दत्त यांनी दावा केला की, जुबेर यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून मुलाची ओळख उघड केली. यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन जुबेर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल :

पाचचा पाढा न आल्याने शिक्षिकेच्या सांगण्यावरुन एका मुलाला बेदम मारहाण केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिक्षिका वर्गातील एका मुलाला इतर मुलांकडून चापट मारायला लावत होती. यावेळी शिक्षिकेने वर्गात धार्मिक टिपण्णी केली होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अल्पसंख्याक आयोगाने घेतली दखल :

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अशफाक सैफी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोगाच्या वतीने प्राथमिक शिक्षण विभाग आणि आरोपी शिक्षिका तृप्ती त्यागी यांना 6 सप्टेंबर रोजी त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले आहे. यासोबतच नेहा पब्लिक स्कूलशी संबंधित 8 मुद्यांवर मुझफ्फरनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

शाळा बंद करण्याचे आदेश :

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने संबंधित नेहा पब्लिक स्कूल बंद करवण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी शुभम शुक्ला यांनी सांगितले की, 2019 मध्ये शाळेला नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंत मान्यता दिली होती. ती तीन वर्षांसाठी तात्पुरते दिली जाते. या मान्यतेची मुदत 2022 मध्ये पूर्ण झाली आहे. त्यानंतरही शाळा व्यवस्थापनाने मान्यतेचे नूतनीकरण केले नाही. मान्यता नसताना सुरू असलेली शाळा आता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील विभागीय कार्यवाही सुरू आहे. शाळा बंद झाल्यानंतर संबंधित मुलांचे प्रवेश दुसऱ्या शाळेत करण्यात येणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube