पिंग शुन जहाजाची भारतात एंट्री ठरणार गेमचेंजर? तब्बल 7 वर्षांनंतर पहिली इराणी तेल डिलिव्हरी

दक्षिण आशियात वाढलेल्या तेलदरांच्या पार्श्वभूमीवर आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे भारताने हा पर्याय पुन्हा तपासण्यास सुरूवात केल्याचे दिसते.

  • Written By: Published:
Untitled Design 13

First Iranian oil delivery after 7 years : भारताने तब्बल सात वर्षांच्या खंडानंतर इराणकडून कच्च्या तेलाच्या आयातीला पुन्हा हिरवा कंदील दिल्याची महत्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे 2019 पासून थांबलेली ही आयात आता पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. पार्शियन आखातातून भारताच्या दिशेने येणारे पिंग शून हे तेलवाहू जहाज या घडामोडीचे प्रमुख केंद्रबिंदू ठरले आहे. 2025 मध्ये निर्बंधांच्या यादीत समाविष्ट असलेले हे जहाज या आठवड्याच्या अखेरीस भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील वडीनार बंदरावर पोहोचण्याची शक्यता आहे. या टँकरने मार्चच्या सुरूवातीला इराणमधील खार्ग बेटावरून कच्चे तेल भरले होते. मात्र या जहाजाचे अंतिम गंतव्य अद्याप निश्चित नसून ते कधीही बदलू शकते.

मे 2019 नंतर प्रथमच भारताने इराणी तेल खरेदीकडे पाऊल टाकले आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे भारतासह अनेक देशांनी इराणकडून तेल खरेदी थांबवली होती. मात्र सध्या दक्षिण आशियात वाढलेल्या तेलदरांच्या पार्श्वभूमीवर आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे भारताने हा पर्याय पुन्हा तपासण्यास सुरूवात केल्याचे दिसते. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेतील तेलपुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. होर्मूझ समुद्रधुनीत वाहतूक अडथळ्यांत आली असून जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेने अलीकडेच इराणी तेलवाहू टँकर्सना तात्पुरती सूट देत जागतिक बाजाराला काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.

तथापि, या व्यवहारांपुढे अजूनही अनेक अडथळे कायम आहेत. विशेषतः पेमेंट, शिपिंग आणि विमा यासंदर्भातील अडचणींमुळे व्यवहार पूर्ण करणे कठीण ठरत आहे. याचाच प्रत्यय अलीकडील एलपीजी व्यवहारातून आला आहे. सी बर्ड हे जहाज 30 मार्च रोजी मंगळूरला पोहोचले असले तरी त्यावरील माल अद्याप उतरावलेला नाही. पेमेंटसंबंधी प्रश्न सुटले नसल्याने खरेदीदार माल स्वीकारण्यास तयार नसल्याचे समजते.

लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, काय आहे नवी तारीख?

अमेरिकेकडून तात्पुरती सूट मिळून देखील अनेक बँका इराणी तेलाशी संबंधित व्यवहारांमध्ये मध्यस्थी करण्यास नकार देत आहेत. कारण अशा व्यवहारांमध्ये अजूनही निर्बंधित इराणी संस्थांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक जोखीम वाढते. दरम्यान, ‘पिंग शुन’ या जहाजाने भारताकडे वळण्यापूर्वी चीनकडे जात असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या बदलत्या हालचालींमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात उत्सुकता वाढली आहे. भारतासाठी ही डिलिव्हरी पहिली ज्ञात इराणी तेल आयात ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर भारतातील प्रमुख रिफायनरी कंपन्या, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि वडीनार येथील नायरा एनर्जी, यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, नायरा एनर्जीचा प्लांट देखभालीसाठी बंद राहणार असल्याने सध्या कच्च्या तेलाच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. एकूणच, इराणी कच्च्या तेलाच्या पुनरागमनामुळे भारताच्या ऊर्जा धोरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र पेमेंट आणि निर्बंधांशी संबंधित अडचणी सुटल्याशिवाय हा मार्ग पूर्णपणे मोकळा होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us