काश्मीरपासून उत्तराखंडपर्यंत पावसाचा कहर; भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
Amarnath Yatra 2023: गेल्या 24 तासांपासून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये संततधार सुरु असल्याने अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. या राज्यांमध्ये येत्या दोन दिवसांत आणखी पावसाचा इशारा आयएमडीने दिला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या चार दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे. त्यामुळे यावर्षीची अमरनाथ यात्रा शनिवारी (8 जुलै) सलग दुसऱ्या दिवशी पाऊस आणि भूस्खलनामुळे स्थगित करण्यात आली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, “मी वैयक्तिकरित्या आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आणि अमरनाथ श्राइन बोर्डचे सीईओ डॉ. मनदीप भंडारी यांच्याशी बोललो आहे. दोन्ही वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर स्वतः लक्ष ठेवून आहेत.
अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे शुक्रवारी (7जुलै) यात्राही स्थगित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने अनंतनाग जिल्ह्यातील 48 किमी लांब पारंपरिक पहलगाम मार्गावरील यात्रा आणि गांदरबल जिल्ह्यातील 14 किमी लांबीच्या बालटाल मार्गावरील यात्रा विशेषत: स्थगित करण्यात आली होती. यामुळे काश्मीर खोऱ्यातील विविध बेस कॅम्पमध्ये सुमारे 50,000 यात्रेकरूंना ठेवण्यात आले. गांदरबल जिल्ह्यातील बालटाल बेस कॅम्पवर सुमारे 19,000 यात्रेकरूंना ठेवण्यात आले आहे.
नेपाळ-भारत सीमेवरील पंचेश्वर धरण प्रकल्प 3 महिन्यांत पूर्ण, DPR ला अंतिम स्वरूप
दक्षिण काश्मीर हिमालयातील 3 हजार 888 मीटर उंचीवर असलेल्या 62 दिवसांची अमरनाथ यात्रा 1 जुलै रोजी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल येथून सुरू झाली आणि 31 ऑगस्ट रोजी संपणार आहे. आतापर्यंत 80 हजार 000 हून अधिक यात्रेकरूंनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले आहे.