‘डिजिटल हायवे’ गंगा एक्सप्रेसवेचे उदघाटन, जिथे कचऱ्याचा पुनर्वापर, AI तंत्रज्ञान आणि 5G कनेक्टिव्हिटीने घडतोय नवा अध्याय
ganga expressway या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून फक्त वाहतूकच नव्हे, तर डिजिटल, ऊर्जा आणि दळणवळण यांचा देखील विकास साधला जाणार आहे.
ganga expressway first digital highway of india : उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेचे आज उद्घाटन झाले असून, हा केवळ आणखी एक महामार्ग नसून देशातील सर्वात आधुनिक आणि बहुआयामी पायाभूत प्रकल्पांपैकी एक म्हणून समोर आला आहे. मेरठ ते प्रयागराज असा 594 किमीचा हा एक्सप्रेसवे पारंपरिक रस्त्यांपेक्षा वेगळा ठरतो, कारण तो ‘डिजिटल हायवे’, ‘ग्रीन हायवे’ आणि ‘स्मार्ट हायवे’ या तिन्ही संकल्पनांचा संगम आहे.
या मार्गावर स्वतंत्र युटिलिटी कॉरिडॉरमधून ऑप्टिकल फायबर, वीज आणि गॅस पाइपलाइन एकाच वेळी नेण्याची सुविधा आहे, ज्यामुळे भविष्यातील दळणवळण आणि ऊर्जा गरजा पूर्ण होतील. AI-आधारित स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि अपघातांना तत्काळ प्रतिसाद देणारी प्रणाली यामुळे हा एक्सप्रेसवे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही एक पाऊल पुढे आहे. तसेच लाखो टन फ्लाय अॅशचा वापर आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पर्यावरणपूरक दृष्टीकोनही जपला गेला आहे.
उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवे हा फक्त एक रस्ता नसून राज्याच्या आर्थिक, तांत्रिक आणि अभियांत्रिकी प्रगतीचा नवा पाय ठरत आहे. मेरठ ते प्रयागराज असा तब्बल 594 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा वापर करून उभारला गेला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पात लाखो टन औद्योगिक कचऱ्याचा पुनर्वापर करण्यात आला असून सुमारे 18 लाख झाडांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे.
या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून फक्त वाहतूकच नव्हे, तर डिजिटल, ऊर्जा आणि दळणवळण यांचा देखील विकास साधला जाणार आहे. ऑप्टिकल फायबर, वीज आणि गॅस पाईपलाईन एकाच कॉरिडॉरमधून नेल्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला दरवर्षी अब्जावधी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, या डिजटल नेटवर्कमुळेच एक्सप्रेसवेच्या देखभालीचा खर्च देखील भागवला जाणार आहे.
1 मे पासून होणारे ‘हे’ 6 मोठे बदल ; सामान्य माणसावर काय होणार परिणाम ?
गंगा एक्सप्रेसवेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचा डिजटल हायवे ही संकल्पना. एक्सप्रेसवेच्या कडेला 2 मीटर रुंदीचा युटिलिटी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. त्यामुळे इंटरनेट केबल किंवा इतर वायर टाकण्यासाठी रस्ता पुन्हा उकरण्याची गरज भासणार नाही. या कॉरिडॉरमध्ये ऑप्टिकल फायबर, वीज तारा, गॅस पाईपलाईन सहज बसवता येतील. या माध्यमातून सुमारे 519 गावांना हायस्पीड इंटरनेट आणि 5 जी कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. भविष्यात या मार्गावर एज डेटा सेंटर उभारले जाऊन उत्तर प्रदेशाला बेंगळुरू किंवा हैद्राबादप्रमाणे डिजिटल बळकटी मिळण्याची शक्यता आहे.
ऊर्जा क्षेत्रात देखील हा एक्सप्रेसवे महत्वाची भूमिका बजावणार आहे. ऊर्जा गंगा प्रकल्प अंतर्गत या मार्गालगत नैसर्गिक वायू पाईपलाईन टाकण्याची सोया करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील गावांना आणि उद्योगांना स्वस्त दरात पीएनजी आणि सीएनजी उपलब्ध होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गंगा एक्सप्रेसवे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. संपूर्ण मार्गावर स्मार्ट एलईडी लाईटस, हाय रेझोल्यूशन कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले आहेत. हे सर्व एकत्र येऊन स्मार्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यरत ठेवतात. अपघात, वाहतूक कोंडी किंवा वाहन थांबवणे यांसारख्या घटना घडताच कंट्रोल रूमला तात्काळ अलर्ट मिळतो आणि काही मिनिटांत मदत पोहोचते.
शिंदेंसोबत आमदारकीसाठी जाणार नाही पण विधानपरिषद दिली तर…, बच्चू कडूंकडून भूमिका स्पष्ट
या प्रकल्पात एआयचा देखील वापर करण्यात आला आहे. चुकीच्या दिशेने जाणारे वाहन, जास्त वेळ थांबलेली गाडी किंवा वेगमर्यादा ओलांडणारे वाहन ओळखून सिस्टम आपोआप अलर्ट देते. त्यामुळे अपघात टाळणे आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीपणे शक्य झाले आहे. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून देखील हा प्रकल्प विशेष ठरतो. कोळशापासून निर्माण होणारी फ्लाय अॅश मोठ्या प्रमाणावर वापरून रस्त्याची पायाभरणी करण्यात आली आहे. अंदाजे 65 ते 70 लाख टन अॅशचा वापर करून लाखो घनमीटर सुपीक माती वाचवण्यात आली आहे. यामुळे प्रदूषण कमी करण्यास आणि खर्च वाचवण्यास देखील मदत झाली आहे.
तांत्रिक कामगिरीत देखील गंगा एक्सप्रेसवेने विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या 24 तासांत 10.3 किलोमीटर लांबीचा काँक्रीट बॅरियर तयार करून त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत अदाणी ग्रुप यांचा मोठा वाटा आहे. एकूण 594 किलोमीटरपैकी सुमारे 464 किलोमीटरचा भाग त्यांनी उभारला आहे, जो बदायू ते प्रयागराजपर्यंत पसरलेला आहे. उर्वरित मेरठ ते बदायू सुमारे 130 किलोमीटरचा भाग IRB इन्फ्रा यांनी तयार केला आहे.
अदानी ग्रुपने हा प्रकल्प DBFOT मॉडेलवर उभारला असून पुढील 30 वर्षे टोल वसुली आणि संचालनाचा अधिकार त्यांच्याकडे राहणार आहे. सुमारे 17 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या खासगी एक्सप्रेसवे प्रकल्पांपैकी एक मानला जातो. एकूणच, गंगा एक्सप्रेसवे हा फक्त वाहतुकीचा मार्ग नसून डिजिटल, ऊर्जा, पर्यावरण आणि सुरक्षिततेचा समतोल साधणारा आधुनिक भारताचा एक महत्वकांक्षी चेहरा म्हणून समोर येत आहे.