दारू सगळं काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरची खोचक टीका

दारू सगळं काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य; गौतम गंभीरची खोचक टीका

Gautam Gambhir On Sanjay Singh : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या दिल्लीच्या घरी ईडीने आज सकाळी छापेमारी केली. दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन ठिकाणी संजय सिंह यांचे नाव आहे. त्यामुळं ही छापेमारी करण्यात आली. त्यानंतर दुपारनंतर त्यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी याच प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांना अटक करण्यात आली. यावर भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी आपवर निशाणा साधला.

कथित दारू विक्री धोरण घोटाळा प्रकणात ईडीच्या पथकाने सकाळी संजय सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकून तपास सुरू केला. दिल्ली दारू घोटाळ्याच्या चौकशीसाठी ईडीचे पथक सकाळी सात वाजता संजय सिंह यांच्या घरी पोहोचले होते. सिंह यांना अटक केल्यानंतर गौतम गंभीरने ट्वीटरवर पोस्ट करत म्हटले आहे की, दारू सर्व काही नष्ट करते, मग ते आरोग्य असो वा चारित्र्य. तर मग आपचे नुकसान का करणार नाही? असा खोचक सवाल केला.

संजय सिंह यांच्या अटनेकनंतर दिल्लीतील सत्ताधारी आप आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप आमने-सामने आले आहेत. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्या एक वर्षापासून दारू घोटाळ्याचा गाजावाजा होत आहे. मात्र, भाजपला एक पैसाही मिळालेला नाही. कुठूनही पैसे सापडले नाहीत. 2024 च्या निवडणुका येत आहेत. भाजपला माहिती आहे की, ते हरणार आहे. याची धास्ती त्यांनी घेतल्यां हे त्यांचे हताश प्रयत्न आहेत. निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी ईडी आणि सीबीआयसारख्या सर्व एजन्सी सक्रिय होतील, असंही केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, संजय सिंह यांच्या अटकेची बातमी समजताच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी जमा झाले. संजय सिंह यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. आज रात्री ते ईडीच्या लॉकअपमध्ये असतील असे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना उद्या सकाळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

संजय सिंह हे अरविंद केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. अनेक सहकारी केजरीवाल यांनी सोडून गेले. मात्र, संजय सिंह त्यांच्यासोबत राहिले. पेशाने पत्रकार असलेल्या संजय सिंह यांना केजरीवाल यांनी राज्यसभेत संधी दिली होती. संजय सिंह हे सातत्याने राज्यसभेत आणि बाहेरही मोदी सरकारवर टीका करताना दिसायचे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube