पोर्ट ब्लेअरला तुम्ही किती ओळखता? जाणून घ्या, शहराच्या नावाचा इतिहास…
Port Blair renamed As Sri Vijaya Puram : हिंद महासागरातील उत्तर पूर्व भागात अंदमान निकोबार बेटे आहेत. या बेटांबाबत तुम्ही पुस्तकात वाचलच असेल. याच बेटांच्या समूहाची राजधानी म्हणजे पोर्ट ब्लेअर. केंद्र सरकारने नुकतेच पोर्ट ब्लेअरचे (Port Blair) नाव बदलले आहे. आता पोर्ट ब्लेअर नाव इतिहासजमा झाले असून या शहराला ‘श्री विजयपुरम’ या (Sri Vijaya Puram) नव्या नावाने ओळखले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एक्सवर पोस्ट लिहीत सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयाने पोर्ट ब्लेअर आणि अंदमान निकोबार बेटांचा मुद्दा देशभरात चर्चेत आला आहे. याच निमित्ताने आपण पोर्ट ब्लेअर कशासाठी प्रसिद्ध आहे? या बेटाचा इतिहास नेमका कसा आहे? याची माहिती घेऊ या..
का फेमस आहे पोर्ट ब्लेअर?
तसं पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून पोर्ट ब्लेअर प्रसिद्ध आहे. तुम्ही सेल्युलर जेलचं (Cellular Jail) नाव ऐकलं असेलच. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात सर्वात कुख्यात जेल म्हणजे सेल्युलर जेल. काळया पाण्याची शिक्षा म्हटलं की सेल्युलर जेल असं समीकरण त्याकाळी रूढ झालं होतं. सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर शहरातील अटलांटा पॉइंटवर स्थित आहे. तीन मजल्यांचे हे जेल आहे. 1906 मध्ये इंग्रजांनी या जेलचे बांधकाम केले होते. भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांना येथे कैदेत टाकले जात होते. बटूकेश्वर दत्त, बाबाराव सावरकर, विनायक दामोदर सावरकर, दिवान सिंह यांना याच तुरुंगात बंद करण्यात आले होते.
मोठी बातमी : मोदी-शाहंकडून पोर्ट ब्लेअरचे नामकरण; श्री विजयपुरम म्हणून ओळखले जाणार
शहराला पोर्ट ब्लेअर नाव कसं पडलं?
या शहराला पोर्ट ब्लेअर नाव कसं पडलं यामागे थोडा इतिहास आहे. लेफ्टनंट आर्चीबाल्ड ब्लेअरच्या नावावरून या शहराला पोर्ट ब्लेअर नाव देण्यात आले. ब्लेअर ईस्ट इंडिया कंपनीत नौदल अधिकारी होते. सन 1789 मध्ये त्यांनी या परिसराचा सर्वे केला होता. येथे एक आरा गिरणी आहे. आशिया खंडातील ही सर्वात जुनी आणि सर्वात मोठी आरा गिरणी असल्याचे मानले जाते. सन 1883 मध्ये या गिरणीची सुरुवात करण्यात आली होती.
जपानी सैन्याने केला होता कब्जा
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1942 मध्ये जपानी सैन्याने पोर्ट ब्लेअर ताब्यात घेतले होते. सेल्युलर जेल मधील कैद्यांना या सैन्याने सोडून दिले होते. परंतु नंतर या सैन्याने कैद्यांच्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. याच कारणामुळे जपानी सैनिकांना ब्रिटिश सैनिकांपेक्षा जास्त क्रूर मानले जात होते. 29 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस अंदमानला गेले होते. येथे जपानी सैन्याच्या अडमिरल इशिकावा यांनी त्यांचे स्वागत केले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी नेताजी पोर्ट ब्लेअरला गेले होते. येथे पहिल्यांदा भारतीय ध्वज फडकवण्यात आला. त्यांनीं या जेलचा दौरा सुद्धा केला होता. ज्या ठिकाणी भारतीय कैद्यांना ठेवले होते तेथे त्यांना नेले नाही.
मान्सून अंदमानमध्ये दाखल होताच वातावरण बदललं; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा