रात्रीस खेळ चाले! बैठक, पत्नीला फोन, रुग्णालयात मंत्री; अशी संपली वांगचुक यांच्या उपोषणाची लढाई

Sonam Wangchuk बैठक संपल्यानंतर शाह यांच्या सूचनेनुसार डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशी थेट संपर्क साधला.

  • Written By: Published:
Sonam Wangchuk
Sonam Wangchuk Hunger Strike End Inside Story : तब्बल 26 दिवसांपासून सुरू असलेलं सोनम वांगचुक यांचं उपोषण गुरुवारी मध्यरात्री अचानक संपलं आणि अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला अवघ्या काही तासांत असं काय घडलं की सरकार आणि वांगचुक यांच्यातील तणाव संवादात बदलला? यामागे पडद्यामागे सुरू असलेल्या उच्चस्तरीय हालचाली निर्णायक ठरल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यात जवळपास चार तास मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत वांगचुक यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत संवादातून मार्ग काढण्याचा निर्णय झाला.

पहिली चाल पत्नी गीतांजलींना फोन

बैठक संपल्यानंतर अमित शाह यांच्या सूचनेनुसार डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांच्याशी थेट संपर्क साधला. सरकार त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक असून, कोणताही संघर्ष नको तर संवादातून तोडगा काढायचा आहे, असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. त्याचबरोबर वांगचुक यांनी उपोषण सोडावे, अशी विनंतीही करण्यात आली.

मग थेट रुग्णालयात पोहोचले मंत्री

याच चर्चेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात पोहोचले. त्यांनी सोनम वांगचुक यांची प्रत्यक्ष भेट घेत सरकारकडून लेखी आश्वासनपत्र सुपूर्द केले. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे आणि त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले.

लेखी आश्वासनानंतर घेतला मोठा निर्णय

सरकारकडून लेखी हमी मिळाल्यानंतर वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या सुमारे 11 मिनिटांच्या व्हिडिओत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला आणि सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले.

आज पुढील चर्चेची तयारी

सरकारने CJP प्रतिनिधींना दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. दोन्ही बाजूंमधील औपचारिक चर्चेला आज सुरुवात होणार असून, यामध्ये पुढील मार्ग निश्चित केला जाणार आहे.

पुढील आठवड्यात संसदेत विधेयक?

चर्चेदरम्यान सरकारने कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) चौकटीत नवीन विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान सचिन तेंडुलकरांची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या भावनांना दिला आवाज

लडाखला परतण्यापूर्वी समर्थकांशी संवाद

उपोषण मागे घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांनी आपण लडाखला परतणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याआधी आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि समर्थकांशी संवाद साधून सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलन शांततामय आणि रचनात्मक मार्गानेच पुढे नेण्याची भूमिकाही त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

follow us