ट्रम्प यांच्या धमकीचा ‘बाजार’ उठला, इराणप्रमाणेच भारतीय शेअर मार्केटनेही धाक झुगारला; पहा चाल

Share Market डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर जागतिक बाजारात मोठी घसरण अपेक्षित होती. मात्र, भारतीय बाजार सावरला, त्यावरून

  • Written By: Published:
ट्रम्प यांच्या धमकीचा 'बाजार' उठला, इराणप्रमाणेच भारतीय शेअर मार्केटनेही धाक झुगारला; पहा चाल

मध्यपूर्वेतील वाढता तणाव, कच्चे तेल आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली धमकी, अशा सर्व नकारात्मक जागतिक संकेतांना झुगारून देत भारतीय शेअर बाजाराने आज (दि.6) आपली चिकाटी दाखवून दिली. तीन दिवसांच्या प्रदीर्घ सुटीनंतर बाजार उघडताना गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण होते, मात्र प्रत्यक्षात बाजाराने ‘फ्लॅट’ पण आश्वासक सुरुवात केली.

बाजार उघडताच ‘ग्रीन सिग्नल’

सकाळच्या सुमारास प्री-ओपनिंग सेशनमध्ये सेंसेक्स 185 अंकांच्या वाढीसह सकारात्मक उघडला. दुसरीकडे, निफ्टी 50 मध्येही 0.30 % किंवा 67 अंकांची वाढ होऊन तो 22,780 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. सुरुवातीला ‘गिफ्ट निफ्टी’मध्ये 82 अंकांची घसरण दिसत असल्याने बाजार कोसळणार असा अंदाज होता, मात्र भारतीय गुंतवणूकदारांनी ट्रम्प यांच्या विधानाला फारसे गांभीर्य दिले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.

भारतीय बाजाराचेही ट्रम्प यांच्या धमकीकडे दुर्लक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या कठोर धमकीनंतर जागतिक बाजारात मोठी घसरण अपेक्षित होती. मात्र, भारतीय बाजार ज्या पद्धतीने सावरला, त्यावरून सोशल मीडियावर “इराणप्रमाणेच भारतीय शेअर बाजारानेही ट्रम्प यांच्या धमकीला घाबरणे सोडून दिले आहे.” अशी चर्चा रंगली.

बँकिंग आणि ऑटो क्षेत्राची सरशी

सप्ताहाच्या सुरुवातीलाच भारतीय शेअर बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला. निफ्टी 22,780 च्या पातळीवर उघडला त्यात 67 अंकांची (0.30%) वाढ नोंदवण्यात आली, तर सेंसेक्स 73,477.53 वर पोहोचत 185 अंकांनी (0.22%) वधारला. या तेजीचे मुख्य सारथ्य बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सनी केले. सुरुवातीच्या सत्रात बहुतांश सेक्टोरल इंडेक्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते; ज्यामध्ये निफ्टी PSU बँक इंडेक्सने सर्वाधिक 0.51% ची झेप घेतली. त्यासोबतच खासगी बँका, ऑटो, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि आयटी क्षेत्रातही गुंतवणूकदारांचा ओघ वाढल्याने बाजाराला भक्कम आधार मिळाला. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय बाजारपेठेतील ही क्षेत्रीय वाढ गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरत आहे.

आरबीआयच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष!

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि अद्याप संघर्षविरामासाठी न मिळालेले यश, यामुळे शेअर बाजार तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्या सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकन बाजाराने गेल्या आठवड्यात चांगली कामगिरी केली असली, तरी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) सारख्या महत्त्वाच्या तेल पुरवठा मार्गावरील धोका, यामुळे जागतिक बाजाराचा मूड अद्याप नाजूक आहे.

त्यात या आठवड्यात आरबीआयची एमपीसी (MPC) बैठक बाजारासाठी एक अत्यंत महत्त्वाचा ‘ट्रिगर’ ठरणार आहे. विशेष म्हणजे, परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) 9,931 कोटींची मोठी विक्री करून दबाव निर्माण केला असताना, स्थानिक संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs) 7,200 कोटींची खरेदी करून बाजाराला मोलाचा आधार दिला आहे. दुसरीकडे, कमर्शियल वाहनांच्या विक्रीत झालेली सुधारणा ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक चिन्ह असली, तरी भू-राजनीतिक घडामोडींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, असा सूर विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

follow us