आता कागदी नोटा विसरा, पाकिटात येणार ‘पॉलीमर’ नोटांचं बंडल?; RBI मोठ्या निर्णयाच्या विचारात
What Is Polymer Banknotes नेमक्या या नोटा कागदी नोटांपेक्षा किती वेगळ्या असतील? सर्वसामान्यांसाठी हा बदल कसा असेल?
What Are Plastic Currency How Different From Paper : तुमच्या खिशात असलेली नोट चुकून पाण्यात भिजली, चुरगळली किंवा पावसाने ओली झाली तरी ती अजिबात फाटणार नाही? असा कधी तुम्ही कधी विचार केला आहे का? जर केला असेल तर, तुमच्या मनात आलेला हा विचार लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो. कारण, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशात कागदी नोटांच्या जागी प्लॅस्टिक म्हणजेच ‘पॉलीमर’ आधारित नोटा (Polymer Banknotes) चलनात आणण्याच्या एका मोठ्या प्रस्तावावर पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करत आहे. नेमक्या या नोटा कागदी नोटांपेक्षा किती वेगळ्या असतील? सर्वसामान्यांसाठी हा बदल कसा असेल, आणि सध्याच्या नोटा बदलण्याचा विचार का केला जातोय याबद्दलची सविस्तर जाणून घेऊया…
डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी बाजारात आलं ‘USB कंडोम’; मोबाईल चार्ज करताना नक्की काय होणार?
पॉलीमर नोटांचा विचार का?
आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, RBI सध्याच्या कागदी नोटांऐवजी पॉलिमर म्हणजेच प्लॅस्टिकच्या नोटा बाजारात आणण्याचा विचार का करतीये? तर, बाजारातील पैशांची वाढती मागणी, नोटांचे आयुष्य वाढवणे आणि छपाईचा खर्च कमी करणे या उद्देशाने या तंत्रज्ञानाचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
याशिवाय रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेण्यामागे तीन मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे बँकिंग क्षेत्रातील अहवालानुसार, मार्च 2025 ला संपलेल्या आर्थिक वर्षात नोटा छापण्याचा खर्च तब्बल 6,372.8 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आधी 5,101.4 कोटी रुपये होता. याशिवाय दुसरं कारण म्हणजे केवळ एका वर्षात (FY25) बाजारातून तब्बल 23.8 अब्ज (2,380 कोटी) खराब झालेल्या नोटा चलनातून बाहेर काढाव्या लागल्या. यामध्ये 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक होते. तिसरं कारण म्हणजे डिजिटल पेमेंट्स (UPI) वाढत असले, तरी देशात रोख पैशांचा वापरही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. मे 2026 पर्यंत देशातील एकूण चलन 42.86 ट्रिलियन रुपयांवर पोहोचले आहे.
पॉलीमर किंवा प्लॅस्टिक नोट म्हणजे नक्की काय?
पॉलीमर नोटा सामान्य कागदापासून बनवल्या जात नाहीत. यासाठी एका विशेष प्रकारच्या लवचिक प्लॅस्टिक फिल्मचा वापर केला जातो, ज्याला ‘पॉलीमर सबस्ट्रेट’ असे म्हणतात. जरी याला प्लॅस्टिक नोट म्हटले जात असले, तरी त्या तुमच्या एटीएम किंवा क्रेडिट कार्डसारख्या कडक नसतात. या नोटा अत्यंत हलक्या, सहज घड्या पाडता येतील अशा आणि अगदी नेहमीच्या कागदी नोटांप्रमाणेच हाताळता येतील अशा असतात.
कागदी नोटांपेक्षा पॉलीमर नोटा कशा वेगळ्या आणि चांगल्या?
कागदी नोटा पाणी, घाम किंवा मातीमुळे लवकर खराब होतात. याउलट पॉलीमर नोटांवर पाणी आणि धुळीचा कोणताही परिणाम होत नाही. शिवाय या नोटा सहजासहजी फाटत नाहीत आणि त्यांचे आयुष्य कागदी नोटांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. या नोटांमध्ये काही प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली जाऊ शकतात. यात मायक्रो-ऑप्टिक होलोग्राम आणि विशेष शाईचा वापर केला जातो, ज्यामुळे हुबेहूब नकली नोटा तयार करणे जवळपास अशक्य होते. कागदी नोटांच्या तुलनेत या प्लास्टिकच्या नोटा कित्येक पटीने जास्त काळ टिकतात. यामुळे सरकारला वारंवार नवीन नोटा छापण्याची गरज पडणार नाही.ज्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत होईल.
पूर्वी एक झोप झाली की, मिळायचा ‘हाफ टाईम’ मग, आपण झोपेच्या 8 तासांच्या चक्रात कसे अडकलो?
यापूर्वीही केला होता असा प्रयोग
भारतासाठी कागदी नोटांऐवजी पॉलीमर नोटांचा प्रयोग नवीन नाही. यापूर्वी 2012 मधील तत्कालीन सरकारने देशातील विविध भौगोलिक आणि हवामान परिस्थितीचा विचार करून कोची, म्हैसूर, जयपूर, भुवनेश्वर आणि शिमला या पाच शहरांमध्ये 10 रुपयांच्या एक अब्ज पॉलिमर नोटांची चाचणी घेण्यास मंजुरी दिली होती.
फोटो काढताना दाखवलेली दोन बोटं ठरू शकतात तुमच्यासाठी धोक्याचे; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा
सुरुवात कुठून होणार आणि आधी कोणती नोट बदलणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, आरबीआय लवकरच याबाबत एका पायलट प्रोजेक्टची घोषणा करू शकते. पटना आणि मुंबई येथे झालेल्या आरबीआयच्या मागील दोन संचालक मंडळाच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली आहे. ज्यात बाजारात रोजच्या वापरादरम्यान 10 आणि 20 रुपयांच्या नोटा सर्वात आधी आणि लवकर खराब होतात. म्हणूनच, प्रयोग म्हणून सर्वात आधी 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घेतली जाण्याची शक्यता आहे.
तुमच्या खिशातील नोटा लगेच बदलणार का?
हे सर्व ऐकलं आणि वाचल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, पाकीटात असलेल्या नोटा लगेच बदलल्या जाणार का? तर, याचं उत्तर नाही असे आहे. कारण सध्या RBI अशा नोटा चलनात आणण्याच्या विचारात आहे. मात्र, आरबीआयने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आरबीआय आधी या नोटांची बाजारात चाचणी घेईल. सर्वसामान्यांना या नोटा वापरताना काय अडचणी येतात, हे पाहिले जाईल आणि त्यानंतरच टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू केला जाईल. त्यामुळे सध्या तुमच्या खिशातील कागदी नोटा पूर्णपणे सुरक्षित आणि कायदेशीर आहे.
जगातील कोणत्या देशांमध्ये पॉलीमर नोटा चलनात?
पॉलिमर नोटा चलनात आणणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश मानला जातो. त्यानंतर, कॅनडा, न्यूझीलंड, ब्रुनेई, रोमानिया, व्हिएतनाम आणि पापुआ न्यू गिनी यांसारख्या अनेक देशांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. आज, पॉलीमर चलन जगाच्या अनेक भागांमध्ये वापरले जाते आणि ते आधुनिक चलन छपाई तंत्रज्ञानाचा एक भाग मानले जाते.