लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय द्विपक्षीय पातळीवरच; परराष्ट्र सचिवांनी ट्रम्पचा दावा फेटाळला

Vikram Misri : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील (Pakistan) 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानकडून भारतातील 15 शहरांवर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र भारतीय एअर डिफेन्सने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. तर दुसरीकडे अमेरिकेचे (America) राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असणारी लष्करी कारवाई थांबवली असल्याचा दावा केला होता मात्र आता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी संसदीय समितीला माहिती देताना लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय द्विपक्षीय पातळीवर घेण्यात आला होता अशी माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा सांगितले आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थी करून हा संघर्ष संपवला. ट्रम्प यांनी असाही दावा केला आहे की जर त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये करार घडवून आणला नसता तर हा संघर्ष अणुयुद्धात बदलू शकला असता. संसदीय पक्षात उपस्थित असलेल्या काही विरोधी खासदारांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केले. भारताने स्पष्ट केले आहे की दोन्ही देशांमधील थेट चर्चेनंतरच युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला.
Delhi | Foreign Secretary Vikram Misri arrives at Parliament House Annexe for the Standing Committee meeting on External Affairs pic.twitter.com/JPzgevgpMs
— ANI (@ANI) May 19, 2025
दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा
सोमवारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ऑपरेशन सिंदूरवरील संसदीय समितीला माहिती देताना सांगितले की युद्धबंदीचा निर्णय द्विपक्षीय पातळीवर घेण्यात आला होता. 10 मे रोजी दोन्ही देशांमधील डीजीएमओ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर सर्व लष्करी कारवाया थांबवण्याचा करार झाला. अशी माहिती आज संसदीय समितीला दिली.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय स्थायी समितीच्या या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि दीपेंद्र हुडा, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भाजपचे अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते.