अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी नुकसानभरपाई, भारतीय कुटुंबाला ‘इतके’ पैसे मिळणार का?
स्थानिक माध्यमांनी ही बातमी प्रथम प्रसिद्ध केली. कुटुंबाच्या वकिलांनी अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नुकसानभरपाईमध्ये गणली जाणारी रक्कम जान्हवी कंडुलाच्या कुटुंबाला देणार अशी बातमी समोर आली आहे. (America) अमेरिकेतील सिएटल येथे 2023 मध्ये घडलेल्या अपघातात भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुला हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तिच्या कुटुंबाला सुमारे 262 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. 23 वर्षीय जान्हवी भारतातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. ती सिएटलमधील नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये इन्फॉर्मेशन सिस्टीम्समध्ये मास्टर्स करत होती. तिथेच तिचा मृत्यु झाला.
नेमकं काय घडलं?
सिएटल पोलिस विभागातील अधिकारी केविन डेव हे ड्रग ओव्हरडोज संदर्भातील आपत्कालीन कॉलला प्रतिसाद देण्यासाठी जात होते. ज्या परिसरात वेगमर्यादा 25 मैल प्रतितास होती, त्या ठिकाणी ते सुमारे 74 मैल प्रतितास (अंदाजे 119 किमी/तास) वेगाने वाहन चालवत होते. गाडीवरील इमर्जन्सी लाईट्स सुरू होत्या आणि सायरनही वाजत होता, तरीही क्रॉसवॉकवरून रस्ता ओलांडणाऱ्या जान्हवीला वाचवता आले नाही. या प्रकरणानंतर अधिकाऱ्यावर निष्काळजी वाहनचालकतेबद्दल 5,000 डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आणि त्यांची नोकरीही काढण्यात आली. मात्र, किंग काउंटीच्या अभियोजकांनी गंभीर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही, कारण जाणूनबुजून सुरक्षेची पायमल्ली केल्याचे ठोस पुरावे आढळले नाहीत. जानेवारी 2023 मध्ये ही घटना घडली.
बॉडी कॅमेरा व्हिडीओमुळे संताप
प्रकरण अधिक वादग्रस्त ठरले ते दुसऱ्या अधिकारी डॅनियल ऑडरर यांच्या बॉडी कॅमेरा रेकॉर्डिंगमुळे. त्या व्हिडीओमध्ये ते हसत-हसत जाह्नवीच्या आयुष्याची ‘मर्यादित किंमत’ असल्याचे म्हणताना ऐकू येतात आणि “फक्त एक चेक लिहून द्या” असं बोलताना ऐकायला येते. या वक्तव्यामुळे मोठा संताप व्यक्त झाला. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील नागरी देखरेख समितीने म्हटले की, अशा वक्तव्यांमुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली आणि जनतेचा विश्वास डळमळीत झाला.
दरम्यान, गेल्या शुक्रवारी किंग काउंटी सुपीरियर कोर्टात नुकसानभरपाईसंदर्भातील तडजोड प्रस्ताव दाखल करण्यात आला. स्थानिक माध्यमांनी ही बातमी प्रथम प्रसिद्ध केली. कुटुंबाच्या वकिलांनी अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. शहराच्या अटर्नी एरिका इव्हान्स यांनी म्हटले की, “जाह्नवी कंडुला यांचा मृत्यू अत्यंत वेदनादायक होता. हा आर्थिक समझोता कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे.” ही घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर पोलिस जबाबदारी आणि सार्वजनिक विश्वास या व्यापक मुद्द्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.
