अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण, आतापर्यंतचा सर्वात नीचांक नोंदवला

ताज्या विक्रीच्या लाटेमुळे, 2026 मधील आतापर्यंतचा एकूण बहिर्वाह 2.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, जो 2025 मधील एकूण विक्रीपेक्षाही अधिक आहे.

News Photo   2026 05 18T163155.727

भारतीय रुपया घसरण्याची मालिका (War) सुरुच असून डॉलरच्या तुलनेत पुन्हा एकदा 96 चा टप्पा ओलांडला असून दिमाखात शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे. आज (18 मे) सकाळच्या सत्रात रुपया प्रति डॉलर 96.21 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. हे सलग पाचवे सत्र आहे ज्यात रुपयाने नवीन सर्वकालीन नीचांक गाठला आहे.

पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकन बाँड यील्डमधील वाढीमुळे भारतीय चलनावर आणखी दबाव वाढला आहे. चालू वर्षात रुपया तब्बल 7 टक्क्यांनी घसरला आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. त्यामुळे, जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि रुपयावर होतो. यावेळीही असेच घडले आहे. इराण युद्धापासून रुपया सुमारे 5.5 टक्के कमकुवत झाला असून, तो आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन बनला आहे.

Ethanol Price : इथेनॉलची किंमत 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढली; लिटरमागे 3 रूपये 71 पैशांची वाढ

बाजार उघडण्याच्या सुरुवातीच्या तासांमध्ये, कच्च्या तेलाचा व्यापार प्रति बॅरल 110 डॉलरवर होत होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर शांतता करारासाठी दबाव आणल्याच्या वक्तव्यानंतर ही भाववाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या या युद्धाला आता 12 आठवडे पूर्ण झाले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून इराणला उघड इशारा दिला. त्यांनी लिहिले की, इराणसाठी ‘वेळ संपत चालली आहे’. त्यांनी धमकी दिली की, इराणने त्वरीत कृती करावी, अन्यथा संपवून टाकले जाईल.

गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणला शांतता कराराचा प्रस्ताव दिला होता, जो इराणने फेटाळला. दोन्ही देशांमधील वादाचे मुख्य कारण इराणची अण्वस्त्र क्षमता आहे, ज्यावर दोन्ही बाजूंमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. परदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) या महिन्यात (मे) आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि भू-राजकीय तणावामुळे परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार भारतीय इक्विटी बाजारातील आपली गुंतवणूक सातत्याने कमी करत आहेत.

या ताज्या विक्रीच्या लाटेमुळे, 2026 मधील आतापर्यंतचा एकूण बहिर्वाह 2.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, जो 2025 मधील एकूण विक्रीपेक्षाही अधिक आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी वगळता 2026 च्या प्रत्येक महिन्यात परदेशी गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते राहिले आहेत. जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांनी बाजारातून 35,962 कोटी रुपये काढून घेतले. फेब्रुवारीमध्ये हा कल उलटला आणि 22,615 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी गेल्या 17 महिन्यांतील एका महिन्यातील सर्वात मोठी गुंतवणूक होती.

follow us