काँग्रेसला दिलासा ! गोठवलेले बॅंक खाते पुन्हा सुरु, ITAT ने दिला आदेश
Congress bank account : काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या बॅंक खात्यांवरील (Congress bank account) बंदी उठवण्यात आली आहे. काँग्रेस नेते अजय माकन (Ajay Maken) यांनी सकाळी पत्रकार परिषदेत पक्षाची खाती गोठवल्याचा आरोप केला होता. वीजबिल आणि पगार भरण्यासाठीही पक्षाकडे पैसे नाहीत, असे ते म्हणाले. दरम्यान यानंतर काँग्रेसने आयकर अपील न्यायाधिकरण (आयटीएटी) समोर अपील देखील दाखल केले होते. यानंतर काँग्रेसला न्यायाधिकरणातून दिलासा मिळाला.
सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या काही दिवस आधी काँग्रेसची खाती गोठवल्याने काँग्रेस नेते चांगलेच संतापले होते. काँग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी बँक खाती गोठवण्याचा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेवर हल्ला आहे अशी टीका केली होती. इतकेच नाही तर प्राप्तिकर विभागाने पक्षाकडून 210 कोटी रुपये मागितले आहे. हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असून निवडणुकीच्या तयारीला खीळ घालण्यासाठी हे केले असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
माकन म्हणाले की, आमचे स्पष्ट म्हणणे आहे की ही खरी लोकशाही नाही. ही केवळ एका पक्षाची हुकुमशाही आहे, देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाला दाबले जात आहे. आता न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि जनतेकडूनच आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे.