Karnataka Election : काँग्रेस अलर्ट! मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी बोलावली बैठक

Karnataka Election : काँग्रेस अलर्ट! मुख्यमंत्री निश्चित करण्यासाठी बोलावली बैठक

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव (Karnataka Election Results) करत दक्षिणेतील या मोठ्या राज्याचा कारभार आपल्या हातात घेतला आहे. निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसने (Congress) आता सत्ता स्थापनेच्या दिशेने पावली टाकली आहेत. राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल हे अद्याप ठरलेले नाही. सध्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivkumar) आघाडीवर आहेत. मात्र, या व्यतिरिक्त आणखी दोन नावे चर्चेत असल्याचे काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रामलिंगा रेड्डी (Ramalinga Reddy) यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करण्यासाठी आणि आमदारांची मते जाणून घेण्यासाठी महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.

रेड्डी म्हणाले, प्रत्येक पक्षात महत्वाकांक्षी नेते असतात. मु्ख्यमंत्री पदासाठी फक्त डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्याच नाही तर एमबी पाटील आणि परमेश्वरा हे दोन नेते इच्छुक आहेत. मुख्यमंत्री पदाचे अधिकारी पक्ष नेतृत्वाकडे आहेत त्यामुळे याबाबत आमदारांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.

कर्नाटकात काँग्रेसला प्रचंड यश मिळाल्याने नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला आता अन्य कोणत्याही पक्षाची गरज नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यात अडचणी नसल्या तरी पक्षांतर्गत नाराजी होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत वाद फायद्याचा ठरणार नाही. राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत पक्ष नेतृत्व निर्णय घेईल हे आधीच ठरले होते. त्यानुसार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांबाबत चर्चा होईल. त्यानंतरच काहीतरी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

विजयानंतरही काँग्रेस तणावात! कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार पोस्टर वॉर

बंगळुरूतील एका हॉटेलमध्ये सायंकाळी ही बैठक होईल. स्थानिक नेते मुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपवतील असे दिसते. या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा निर्णय लगेचच होईल याची शक्यता कमीच आहे. कारण, निर्णय घेण्यात काँग्रेसकडून नेहमीच विलंब होतो. त्यामुळे या बैठकीत फक्त आमदारांची मते जाणून घेण्यात येतील अशीच शक्यता जास्त वाटते.

पोस्टर वॉर सुरू 

दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी चार नावे चर्चेत असली तरी खरी लढत सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातच असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून पोस्टर वॉर सुरू झाले आहे. जेथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी सिद्धरामय्या यांच्या बेंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर एक पोस्टर लावले. त्यावर सिद्धरामय्या यांचा उल्लेख “कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री” असा केला आहे. सिद्धरामय्या यांनी यापूर्वी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यांनाही चांगला अनुभव असून ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

दुसरीकडे, बेंगळुरूमध्ये कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर एक पोस्टर लावले आणि त्यांना कर्नाटकचे “मुख्यमंत्री” घोषित करावे, अशी मागणी केली. त्यामुळं कर्नाटकातील विजयानंतरही काँग्रेसमधील तणाव संपलेला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube