देवेगौडांचं कुटुंब पक्कं राजकारणी! मुले अन् जावई लोकसभेच्या रिंगणात; भाजपशीही दोस्ती
Lok Sabha Election : देशाच्या राजकारणात घराणेशाहीवर नेहमीच गप्पा ठोकल्या जातात. आमदार, खासदार अन् मंत्री एकाच कुटुंबात असल्याचे दिसते. त्यामुळे राजकारण नक्की काय असा प्रश्न नागरिकांना पडतो. परंतु, वर्षानुवर्षे याच परिवारांभोवती देशाचं राजकारण फिरतंय हे वास्तव सुद्धा नाकारून चालणार नाही. राजकारणी मंडळींच्या पिढ्यानपिढ्या राजकारणात आहेत आणि चांगल्या स्थिरस्थावर सुद्धा झाल्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर कर्नाटकातील जनता दल सेक्युलर पक्षाचंच देता येईल. विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा अन् लोकसभेचे सदस्य या पक्षाचे सर्वेसर्वा एचडी देवेगौडा यांच्या कुटुंबात आहेत. आताही लोकसभेच्या निवडणुकीत देवेगौडा यांच्या कुटुंबातील तीन सदस्य नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे, घराणेशाहीने ओतप्रोत भरलेल्या या पक्षाबरोबर घराणेशाहीचा पराकोटीचा तिटकारा करणाऱ्या भाजपाने राजकीय दोस्ती केली आहे.
या लोकसभा निवडणुकीत जनता दलाने भाजपशी हातमिळवणी केली आहे. जागावाटपात भाजपने जेडीएसला तीन जागा दिल्या आहेत. या तीनमधील दोन जागांवर तर परिवारातील सदस्यच उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे जावई सीएन मंजुनाथ भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
Dharashiv Loksabha : पती भाजपचा आमदार अन् पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार; निंबाळकर VS पाटलांमध्ये लढत
तीनपैकी 2 मतदारसंघात घरातलेच उमेदवार
या लोकसभा निवडणुकीत भाजप 25 जागांवर लढणार आहे तर मंड्या, कोलार आणि हासन मतदारसंघ जेडीएसला दिले आहेत. यामध्ये मंड्या मतदारसंघातून एचडी कुमारस्वामी, हासनमधून प्रज्वल रेवन्ना आणि कोलार मतदारसंघातून एम. महेश बाबू निवडणूक रिंगणात आहेत. एचडी देवेगौडा यांचे जावई मंजुनाथ बंगळुरू ग्रामीण मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघात उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे बंधू डीके सुरेश यांच्यात लढत होणार आहे.
जेडीएस पक्षात देवेगौडा यांच्या कुटुंबातीलच नऊ सदस्य राजकारणात आहेत. यावरून अंदाज लावता येतो की या पक्षात घराणेशाहीचा किती प्रभाव आहे. देवेगौडा स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आमदार आहेत. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता रामनगर मतदारसंघातून आमदार आहेत. मुलगा निखिल हा पक्षाच्या युवा आघाडीचा नेता आहे. निखिलने मागील लोकसभा निवडणुकीत आणि 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते. परंतु या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले.
Pune Loksabha : ‘माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर’; धंगेकरांना भलताच कॉन्फिडन्स
देवेगौडांचं अख्खं कुटुंबच पक्कं राजकारणी
देवेगौडा यांचा मोठा मुलगा एचडी रेवन्ना हे आमदार आहेत. तर रेवन्ना यांची पत्नी भवानी या जिल्हा परिषद सदस्य आहेत. मुलगा प्रज्वलने मागील लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले होते परंतु पराभव स्वीकारावा लागला. रेवन्ना यांचा दुसरा मुलगा सूरज हा सुद्धा कर्नाटक विधानपरिषदेचा आमदार आहे. अशा पद्धतीने देवेगौडा यांचा परिवार राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद या चारही सभागृहांचा सदस्य आहे.
लोकसभा निवडणुकीत कुटंबातील तीन सदस्य
मागील लोकसभा निवडणुकीतही देवेगौडा यांच्या कुटुंबातील तीन सदस्य निवडणूक लढवत होते. या निवडणुकीतही पुन्हा तीन सदस्य रिंगणात आहेत. कर्नाटकातील जुन्या मैसुरू परिसराला जेडीएसचा बालेकिल्ला मानले जाते. कारण या भागात वोक्कालिगा समाजाचे वर्चस्व आहे आणि देवेगौडा सुद्धा याच समाजाचे आहेत. घराणेशाहीच्या या राजकारणामुळे देवेगौडा सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी जेडीएस नेत्यांवर सडकून टीका केली आहे. या पक्षाकडे दुसरे उमेदवार नाहीत का? असा सवाल शिवकुमार यांनी विचारला आहे.