सहा जागा गमावल्या, मतं घटली तरीही भाजपला गुडन्यूज; बंगालच्या निवडणुकीत काय घडलं ?
West Bengal Election Result : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची मोठी (West Bengal) पिछेहाट झाली आहे. चारशे पारची घोषणा देणाऱ्या भाजपला साधं बहुमतही मिळालं नाही. त्यामुळे आता केंद्रात टीडीपी आणि जेडीयू यांना सोबत घेत आघाडीच सरकार चालवावं लागत आहे. पण तरीही एका राज्यातून भाजपला दिलासा देणारी बातमी आहे. खरंतर या राज्यातही भाजपला मोठा फटका बसला आहे. पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. एकाच राज्यात इतकी मोठी पिछेहाट झालेली असताना भाजपसाठी नेमकी काय गुडन्यूज आहे ते पाहू या..
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींना झटका
लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपाचा पराभव केला हे खरं आहे. पण ज्या पद्धतीने हा पराभव केला त्यामुळे टीएमसीचंच टेन्शन वाढणार आहे. विशेष म्हणजे, पुढील दोन वर्षांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या चिंतेचं महत्वाचं कारण म्हणजे राज्यातील 125 नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये साठ टक्के जागा अशा आहेत जिथे भाजपने तृणमूलला मागे टाकलं आहे. खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या (Mamata Banerjee) मतदारसंघात सुद्धा भाजपने टीएमसीचा पराभव केला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने शानदार प्रदर्शन करत आपल्या आमदारांची संख्या 3 वरुन थेट 77 वर नेली. राज्यातील 125 पैकी 124 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तृणमूलचेच शासन आहे. फक्त नादिया जिल्ह्यातील ताहेरपूर नगरपालिकेत सीपीएम सत्तेत आहे. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची अशी परिस्थिती का झाली? याची कारणं शोधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी नेत्यांकडून अहवाल मागवला आहे.
मोठी बातमी : विधानसभेसाठी ‘राज’ खेळी, मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे देणार मोठा धक्का
ज्या मतदारसंघात टीएमसी उमेदवाराने विजय मिळवला तेथील नगरपालिकांमध्ये सुद्धा टीएमसी मागे आहे. बोलपूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाला मात्र या भागातील नगरपालिकेच्या 22 पैकी 16 वॉर्डांत भाजपने तृणमूलला पछाडले आहे. अशीच परिस्थिती बांकुरा लोकसभा मतदारसंघातही दिसून येत आहे. या भागातील नगरपालिकांतील 24 पैकी 21 वॉर्डांत भाजप आघाडीवर राहिला आहे.
झारग्राम आणि हुगळीतील चिनसुराह नगरपालिकेतही असाच ट्रेंड दिसून आला आहे. येथे लोकसभा निवडणुकीत तृणमूलच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधील शहरी भागात भाजपच्या वाढत्या जनाधाराचा ट्रेंड 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासूनच सुरु झाला आहे. या निवडणुकीत भाजपने तृणमूलला जोरदार धक्का देत तब्बल 18 जागांवर विजय मिळवला होता. याआधी 2014 च्या निवडणुकीत भाजपला फक्त दोन खासदार निवडून आणता आले होते.
शहरी मतदारांची भाजपला साथ
सन 2021 मधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. राज्यातील 294 पैकी तब्बल 215 जागा काबीज केल्या होत्या. या निवडणुकीतही शहरी पॅटर्न बदलला नव्हता. या निवडणुकीत भाजप राज्यातील 125 पैकी 69 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडीवर राहिला होता. राजधानी कोलकाता महानगरपालिकेत तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. पालिकेच्या एकूण 144 पैकी 45 वॉर्डांत भाजप आघाडीवर आहे. 2021 मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपला फक्त तीन वॉर्डांत विजय मिळाला होता. कोलकात्यात ज्या वॉर्डांमध्ये टीएमसी पिछाडीवर आहे तेथे हिंदी भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे.
स्पीकर पदावर चंद्राबाबूंचा डोळा पण, 1999 चा ‘कटू’ अनुभव भाजप विसरणार का?
काँग्रेसची पिछाडी, टीएमसी-भाजपात खरी लढत
सन 2021 मध्ये भवानीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी 58 हजार 832 मतांच्या अंतराने विजयी झाल्या होत्या. मात्र यावेळी तृणमूलच्या मताधिक्यात मोठी घट झाली आहे. भवानीपूरमधील 269 पैकी 149 वॉर्डांत भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. ही बाब तृणमूलला टेन्शन देणारी ठरणार आहे. पुढील दोन वर्षांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतही सामना भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची स्थिती राज्यात अतिशय दयनीय आहे. त्यामुळे तिसरा पक्ष म्हणून निवडणुकीत आव्हान देण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे तृणमूल काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.
सन 2021 मधील विधानसभा निवडणूक आणि 2024 मधील लोकसभा निवडणूक दोन्ही वेळेस तृणमूल काँग्रेसला सीएए विरोधाच्या मुद्याने मोठे पाठबळ मिळाले. आता पुढील विधानसभा निवडणुकीत सुद्धा हा मुद्दा तृणमूलला किती फायदा मिळवून देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सहा जागा कमी झाल्या असल्या तरीही भाजपने 38.73 टक्के मते मिळवली आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला 40.7 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच दोन निवडणुकीत भाजपच्या मतांत थोडी घट झाली आहे.