मल्लिकार्जुन खर्गेंना G20 डिनरचे निमंत्रणच नाही, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Mallikarjun Kharge on G20 : जी-20 परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. यात 20 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. अनेक देशांचे प्रमुख नेते दिल्लीत पोहोचले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला संध्याकाळी सर्व नेत्यांना डिनरचे निमंत्रण पाठवले आहे. यात विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेतेही सहभागी होणार आहेत. परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना डिनरचे निमंत्रण देण्यात आले नाही. यावरून राजकारण तापले आहे. काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना डिनरसाठी बोलावले नसल्याबद्दलही राहुल गांधींनी आक्षेप घेतला. खासदार राहुल म्हणाले की, यावरून हे दिसून येते की ते विरोधी पक्षाच्या नेत्याचा आदर करत नाहीत आणि आम्हाला जी-20 परिषदेचे निमंत्रण दिले गेले नाही. ते देशाच्या 60% लोकसंख्येच्या नेतृत्वाचा आदर करत नाहीत.
खरगे यांच्या कार्यालयाने सांगितले की, शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या G20 डिनरसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले नाही. तथापि, वृत्तानुसार, इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला निमंत्रित केलेले नाही. कॅबिनेटचे सदस्य, राज्यमंत्री, मुख्यमंत्री, भारत सरकारचे सचिव आणि इतर उल्लेखनीय पाहुण्यांना डिनरसाठी आमंत्रित केले आहे.
9 ते 10 सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर G-20 शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अनेक देशांचे वरिष्ठ नेते दिल्लीत पोहोचले आहेत. जो बिडेन, ऋषी सुनक, फुमियो किशिदा, शेख हसीना दिल्लीला पोहोचले. जो बिडेन यांची आज पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे.