‘मेक इन इंडिया’च्या स्वप्नपूर्तीसाठी जर्मनीतून भारतात परतलो; भरत गिते यांचे प्रतिपादन

Bharat Gite-ध्येयासक्ती, स्वयंशिस्त आणि प्रत्यक्ष कामातील सहभाग गरजेचा असतो. मातीशी जोडलेला, संघर्षातून पुढे आलेलाच परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधतो.

  • Written By: Published:
Bharat Gite

पुणे: जागतिक दर्जाचा उद्योग उभारताना नेतृत्व केवळ पदावर आधारित नसते. त्यामागे ध्येयासक्ती, स्वयंशिस्त आणि प्रत्यक्ष कामातील सहभाग गरजेचा असतो. मातीशी जोडलेला, संघर्षातून पुढे आलेलाच परिस्थितीतून यशाचा मार्ग शोधतो. भारताविषयी असलेले प्रेम आणि ‘मेक इन इंडिया’च्या स्वप्नपूर्तीसाठी जर्मनीतील चांगल्या संधी सोडून भारतात परतलो, असे प्रतिपादन तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व भारताचे अल्युमिनियम मॅन भरत गिते यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (आयएमडीआर) पुणे यांच्या वतीने आयोजित ‘स्टोरीज अँड संवाद’ कार्यक्रमात गिते यांची यशोगाथा उलगडली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फीथिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘आयएमडीआर’चे माजी विद्यार्थी व बजाज जनरल इन्शुरन्सचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख निखिल भारद्वाज यांनी गिते यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी ‘आयएमडीआर’च्या संचालिका डॉ. शिखा जैन, प्रा. अभिजित शिवणे यांच्यासह ‘पीजीडीएम’चे विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. (Returned to India from Germany to fulfill the dream of ‘Make in India’; Bharat Gite )

भरत गिते यांनी परळी (जि. बीड) येथून जागतिक दर्जाच्या अ‍ॅल्युमिनियम उद्योग उभारणीपर्यंतचा ‘भरत से भारत तक’ असा प्रवास उलगडला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) पुणे व जर्मनीतील आरडब्ल्यूटीएच आखेन विद्यापीठ असा शैक्षणिक, तर बीएमडब्ल्यू व महले जीएमबीएचसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील कारकीर्द, यादरम्यान उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता व्यवस्था आणि औद्योगिक संस्कृतीची मिळालेली दृष्टी व अनुभव याविषयी त्यांनी सांगितले.

परदेशात उज्ज्वल संधी असतानाही ‘मेक इन इंडिया’च्या ध्येयाने प्रेरित होऊन भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याचे गीते यांनी स्पष्ट केले. त्यातूनच संरक्षण, अवकाश, रेल्वे व आरोग्य क्षेत्रांसाठी काम करणाऱ्या तौरल इंडियाची स्थापना झाली. अ‍ॅल्युमिनियम हा आधुनिक उद्योगातील अत्यंत महत्त्वाचा धातू असून, देशांतर्गत उत्पादन वाढल्यास संवेदनशील क्षेत्रांतील आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, असे त्यांनी सांगितले. दहा कामगारांपासून सुरू झालेल्या हा प्रवास आज हजारहून अधिक कर्मचाऱ्यांपर्यंत गेला आहे. चाकण, खेड, शिवापूर व सुपा या औद्योगिक भागांत अल्युमिनियम उत्पादन सुरु असून, हजारो लोकांना रोजगार देता आल्याचे समाधान वाटते, असेही त्यांनी नमूद केले.

उद्योगाला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाने ‘शॉप फ्लोअर’शी नाळ जोडून ठेवली, सतत शिकण्याचा ध्यास घेतला आणि कामगारांप्रती आदर ठेवला, तर उद्योग यशाच्या मार्गावर जातो. महिलांच्या सक्षम सहभागाशिवाय उद्योगाचा सर्वांगीण विकास शक्य नाही. त्यामुळे सतत नवनवीन गोष्टी, तंत्रज्ञान आत्मसात करून ग्राहकाभिमुख सेवा, गुणवत्तापूर्ण उत्पादन दिले, तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे गिते यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

डॉ. शिखा जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. डॉ. निशिता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. अभिजीत शिवणे यांनी आभार मानले.

follow us