बंगालमध्ये ‘दीदीं’च्या गडाला सुरूंग! १५ वर्षांचा गड कोसळला, पराभवाची ५ मोठी कारणं
ममता बॅनर्जी यांना या पराभवाच्या क्षणांत नव्हे, तर त्यांच्या लढण्याच्या वृत्तीतून समजून घ्यावे लागते.
पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा पराभव हा केवळ एका निवडणुकीचा निकाल नाही, तो एका दीर्घ, संघर्षमय आणि वादळी राजकीय प्रवासातील सर्वात निर्णायक वळण ठरले आहे. तब्बल १५ वर्षांच्या सत्तेनंतर ‘ममतादीदी’ पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या दिसतात. पण ममता बॅनर्जी यांना या पराभवाच्या क्षणांत नव्हे, तर त्यांच्या लढण्याच्या वृत्तीतून समजून घ्यावे लागते.
कारच्या बोनटवर उभी राहणारी मुलगी
१९७० च्या दशकात, आणीबाणीविरोधी आंदोलनाच्या काळात, एक तरुणी कोलकात्यातील रस्त्यावर गोंधळात अचानक एका कारच्या बोनटवर चढली. ती कार होती Jayaprakash Narayan यांची. त्या क्षणाने ममतांच्या राजकीय आयुष्याचा सूर ठरवला. व्यवस्थेविरुद्ध उभे राहण्याची हिंमत दाखविणारी तरुण राजकीय नेता म्हणून ती पुढे आली. हा प्रसंग फक्त धाडसाचा नव्हता; तो ‘स्टेज’ ओळखण्याच्या त्यांच्या नैसर्गिक क्षमतेचा दाखला होता. गर्दी कुठे आहे, नेमका क्षण कोणता आणि त्याला वेगळा प्रतिकात्मक अर्थ कसा द्यायचा, हे ममतांना तेव्हाच उमगलं होते.
न्यायालयात लढाई
त्यानंतर कित्येक वर्षांनी अगदी अलीकडे २०२६ च्या फेब्रुवारी महिन्यांत मुख्यमंत्री असताना, ममता सर्वोच्च न्यायालयात उभ्या राहून स्वतः युक्तिवाद करताना दिसल्या. साधी पांढरी हातमागाची साडी, पायात हवाई चप्पल आणि थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या दिशेने केलेला प्रश्न, ‘इतकी घाई कशासाठी?’ राजकारणात फार कमी नेते असे आहेत जे न्यायालयाला देखील ‘राजकीय मंचा’मध्ये रूपांतरित करण्याची क्षमता राखतात. ममतांसाठी तो मंच महत्त्वाचा नसतो; कारण महत्त्वाचा असतो तो ‘संघर्षाचा क्षण’.
१९९० मध्ये हजरा येथे डाव्या आघाडीविरोधातील आंदोलनात ममता गंभीर जखमी झाल्या. डोक्यावर पट्टी बांधलेली, रक्ताळलेली ती प्रतिमा संपूर्ण बंगालमध्ये गाजली होती. हा प्रसंग त्यांच्या राजकीय ब्रँडिंगचा कणा ठरला. पीडित पण न झुकणारी नेता. ती प्रतिमा इतकी प्रभावी होती की, पुढील तीन दशकांत त्यांनी सत्ता असो वा विरोधात, स्वतःला ‘लढणारी’ नेता म्हणूनच त्यांनी सादर केले.
बंडखोरीचे संस्थाकरण
१९९७ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस सोडून त्यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. हा निर्णय केवळ राजकीय नव्हता, तो ‘स्वतंत्र ओळख’ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. एक कमी चर्चेतला किस्सा म्हणजे, तृणमूलच्या सुरुवातीच्या काळात, निधीअभावी अनेक सभा रद्द होण्याच्या मार्गावर होत्या. ममतांनी स्वतःच्या चित्रांची विक्री करून पैसे उभे केले, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा तपशील त्यांच्या ‘साधेपणाच्या’ प्रतिमेला अधिक बळ देणारा ठरला.
सिंगूरचे उपोषण
सिंगूरमध्ये जमीन अधिग्रहणाविरोधातील २५ दिवसांच्या उपोषणाने ममतांना केवळ ‘आंदोलक’ नव्हे तर ‘लोकनेता’ ठरवले. हा फक्त धोरणात्मक विरोध नव्हता; तर त्यात भावनिक गुंतवणूकही होती. तिथे उपस्थित असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, उपोषणादरम्यान एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने त्यांना घरगुती जेवण आणले. त्यांनी ते नाकारले, पण त्या कुटुंबाशी अर्धा तास संवाद साधला. ही संवादाची पद्धत, व्यक्तिगत संवाद हा त्यांच्या राजकारणाचा मुख्य घटक राहिला आहे.
सत्ता मिळाल्यानंतरही ‘रस्त्यावर’
२०११ मध्ये West Bengal मध्ये सत्ता मिळाल्यानंतरही ममता बदलल्या नाहीत, किमान त्यांच्या प्रतिमेच्या पातळीवर तरी. त्या अजूनही रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, घोषणाबाजी करतात. RG Kar प्रकरणानंतर, स्वतः मुख्यमंत्री असूनही, त्या आंदोलनात सहभागी झाल्या. (अर्थात या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा खूप वेगात पुढे आला आणि आजही निवडणूक निकालांमध्ये तोच महत्त्वाचा ठरला आहे, अशी राजकीय निरिक्षकांची अटकळ आहे.) हा विरोधाभास सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका हे ममतांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते.
निर्णयक्षमता की उतावळेपणा?
ममता जलद निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जातात. रस्त्यावर अनवाणी मुलांना पाहून त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना चप्पल वाटप योजना सुरू करण्याचा आदेश दिला होता, पण हीच शैली कधी अडथळा ठरते. राज्य नागरी सेवेतील सुधारणा प्रकल्प त्यांनी अचानक थांबवला आणि त्यानंतर तो पुन्हा सुरू झालाच नाही. त्यांच्या निर्णयप्रक्रियेत ‘भावना’ आणि ‘प्रेरणा’ यांचा मोठा वाटा असतो. हेच दोन मुद्दे त्यांच्या राजकारणाची ताकद आणि मर्यादा ठरले.
सत्ता आणि वाद
ईडीच्या एका छाप्यात त्यांनी स्वतः फाईल आणि लॅपटॉप घेऊन बाहेर येत, “मी हे वाचवले, भाजपाला आमची उमेदवार यादी हवी होती. पण मी हे ताब्यात घेतले आहे” असे त्यांनी जाहीर केले. हा प्रसंग त्यांच्या शैलीचे उत्तम उदाहरण ठरतो, त्या प्रशासनालाच भीडतात.
भाचा आणि पक्ष
अभिषेक बॅनर्जी यांना पुढे आणण्याचा निर्णय हा पक्षातील पिढीबदलाचा प्रयत्न मानला जातो. पण यामुळे जुने नेते नाराज झाले आणि काहींनी पक्ष सोडला.
हा निर्णय ममतांच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग असू शकतो, त्यामुळे पक्षातील एकसंधता ढासळली.
आयुष्यातील सर्वात मोठी लढाई
आजचा पराभव हा ममतांसाठी केवळ सत्तेचा गमावलेला क्षण नाही;
तर तो त्यांच्या संपूर्ण राजकीय मॉडेलवर प्रश्नचिन्ह उभे करणारा ठरला आहे.
त्यांनी प्रत्येक निवडणुकीत ‘बंगाल विरुद्ध दिल्ली’ अशी मांडणी केली.
पण यावेळी मतदारांनी कदाचित वेगळा प्रश्न विचारला तो म्हणजे सत्तेतील १५ वर्षांचा हिशेब काय?
पराभवातही लढणारी
ममता बॅनर्जी या जिंकल्या तरी लढतात आणि हरल्या तरीही. त्यांची खरी ताकद सत्तेत नाही; तर ती संघर्षात आहे. आता प्रश्न असा की, त्या पुन्हा एकदा ‘रस्त्यावरची नेता’ होणार का, की सत्तेच्या पराभवाने त्यांची राजकीय ऊर्जा कमी होईल? इतिहास सांगतो की, कारच्या बोनटवर उभी राहणारी ती तरुणी अजून संपलेली नाही.