मोदींना पाठिंबा देणार की देशातील लोकांना? केजरीवालांचा काँग्रेसला खोचक सवाल
Arvind Kejriwal meets Sitaram Yechuri : केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात आणलेला अध्यादेश राज्यसभेत हाणून पाडण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभरात दौरा करत आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यानंतर केजरीवाल यांनी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते सिताराम येचुरी (Sitaram Yechuri) यांची भेट घेतली. यावेळ येचुरी यांनी पार्टी या अध्यादेशाचा विरोध करत असल्याचे सांगितले.
केजरीवाल म्हणाले, हा मुद्दा केजरीवालचा नाही. केजरीवाल महत्वाचा नाही. हा मुद्दा देशातील लोकशाहीचा आहे. देशातील लोकांचा जो अपमान झाला आहे हा त्याचा मुद्दा आहे. संविधानाचा आहे. माझी त्यांना विनंती आहे की केजरीवालचा विचार करू नका. केजरीवालला पाठिंबा देऊ नका. पण, मोदी सरकारने दिल्लीच्या लोकांचा जो अपमान केला. दिल्लीच्या लोकांची सगळी शक्ती काढून घेतली. त्यामुळे दिल्लीच्या लोकांच्या पाठीशी उभे रहा.
‘आताचे दिवस आणीबाणीपेक्षाही वाईट’; केजरीवालांना पाठिंबा देत KCR मोदींवर बरसले
जर या लोकांनी उद्या राजस्थान सरकारविरोधात असा अध्यादेश आणला. त्यावेळी आम्ही त्या विरोधात उभे राहू. त्यावेळी आम्ही असे म्हणणार नाही की हा काँग्रेसचा मुद्दा आहे. कारण हा देशाचा मुद्दा आहे. देशाबरोबर उभे राहण्याचा मुद्दा आहे. त्यामुळे त्यांना आता हेच ठरवायचे आहे की ते मोदींबरोबर उभे आहेत की देशातील जनतेला पाठिंबा देत आहेत.
मला पाठिंबा देण्याचा मुद्दा नाही तर लोकांचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. अशावेळी देशातील 140 कोटी नागरिक आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्र येत याचा जोरदार विरोध केला पाहिजे, असे केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, याआधी केजरीवाल यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. त्यावेळी राव म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते नेहमीच घसा ताणून आणीबाणीच्या विरोध बोलत असतात. आणीबाणीचे काळे दिवस म्हणत असतात. आता तुमचे तरी कोणते अच्छे दिन आहेत. हे काय अच्छे दिन आहेत का, हे तर आणीबाणीतील काळ्या दिवसांपेक्षाही वाईट दिवस आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या दिल्ली सरकारला तुम्ही कामकाज करण्यापासून रोखत आहात. तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू शकत नसाल तर काय करणार, असा सवाल राव यांनी उपस्थित केला.
—
पंजाबचे नेते भडकले, काँग्रेसचे टेन्शन वाढले
पंजाबमध्ये आपने काँग्रेसला पाणी पाजत अक्षरशः सत्ता हिसकावून घेतली. आताही आपकडून राज्यात काँग्रेस संपविण्याचे कारस्थान सुरू आहे, त्यामुळे काँग्रेसने आम आदमी पार्टीला कोणत्याही पाठिंबा देऊ नये, असे पंजाबमधील नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे काँग्रेसचा गोंधळ वाढला. केजरीवालांनी मात्र गुगली टाकत काँग्रेसची चांगलीच कोंडी केली आहे. अशा परिस्थितीत आता काँग्रेस काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.