मोदी सरकारच्या हालचालींनी ‘आप’मध्ये खळबळ! केजरीवाल पोहोचले शरद पवारांच्या घरी
Sharad Pawar : दिल्लीच्या राजकारणात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू आहेत. त्यातच केंद्र सरकारने पावले टाकत दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक संसदेच्य सभागृहात सादर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सरकारच्या या हालचालींमुळे आम आदमी पार्टीच्या गोटात खळबळ उडाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पु्न्हा एकदा प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल आणि पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन या भेटीचा फोटो शेअर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी माझ्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सौजन्य भेट घेतली, असे पवार म्हणाले.
Arvind Kejriwal CM Delhi along with Rajya Sabha MP Raghav Chadha paid courtesy visit to my New Delhi residence. pic.twitter.com/u0ffsCepXC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 26, 2023
केंद्र सरकारने दिल्ली सरकारचे अधिकार कमी करणारा अध्यादेश आणून सत्ताधारी आम आदमी पार्टीची कोंडी केली. आता त्याही पुढे जाऊन या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आता लवकरच हा अध्यादेश सभागृहात मांडला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित हा अध्यादेश आहे.
या अध्यादेशाला राज्यसभेत विरोध करून अध्यादेश मंजूर होऊ नये यासाठी केजरीवाल यांनी अनेक राज्यांचे दौरे करत तेथील मुख्यमंत्र्यांना भेटून पाठिंबा मिळवला. या पक्षांनीही तसे आश्वासन केजरीवाल यांना दिले आहे. लोकसभेत भाजपचे बहुमत असल्याने येथे विधेयक मंजूर होण्यात फारशा अडचणी नाहीत. परंतु, राज्यसभेत तशी परिस्थिती नाही. त्यामुळ येथे काय राजकीय डाव टाकले जातात याची उत्सुकता आहे. या घडामोडींनंतर केजरीवाल यांनी विरोधी नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
पुरस्कार वापसीवर केंद्र सरकार लावणार लगाम, ‘हमीपत्र लिहून घेणार’
केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही सौजन्य भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने ही भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत उभयतांत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.