Opposition Parties Meeting : मेहबूबांशेजारी उद्धव ठाकरे बसले की बसवले गेले?
Opposition Parties Meeting : केंद्रातील सत्ताधीश भारतीय जनता पार्टीला (BJP) सत्तेतून बेदखल करण्याची रणनिती ठरविण्यासाठी आज (दि.23) बिहारची राजधानी पाटण्यात विरोधकांचा गोतावळा जमला होता. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असलेल्या देशातील प्रमुख विरोधी पक्षांना एकाच छताखाली आणण्याची किमया नितीश कुमारांनी साधली खरी. मात्र, या बैठकीत असे काही प्रसंग घडले ज्यामुळे या बैठकीतून खरेच विरोधकांचे ऐक्य साधले का?, बीजेपी विरोधाचा अजेंडा सेट झाला का?, पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर चर्चा झाली का? असे प्रश्न उपस्थित झाले.
इतकेच नाही तर या बैठकीत जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवाल भिडल्याचे कळले तर दुसरीकडे पत्रकार परिषदेत मेहबूबा मुफ्तींशेजारी उद्धव ठाकरे स्वतः बसले की त्यांना बसविण्यात आले? असा प्रश्न चर्चिला जात आहे. या मुद्द्यावर तुफान टीका होणार, राजकारण होणार हे माहिती असतानाही असा प्रकार घडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पिंग-पोंग बॉल, फुगे अन् बर्फाचा वापर करुनही ‘टायटॅनिक’ अद्यापही समुद्रातच, वैज्ञानिक ठरले फेल…
जम्मू काश्मिरात मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर हातमिळवणी केली म्हणून भाजपवर टीकेची झोड उठवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आज जबरदस्त यू टर्न घेतल्याचे दिसून आले. पाटणा येथे आज देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत मात्र वेगळेच चित्र दिसून आले. उद्धव ठाकरे चक्क जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याचे दिसले.
या बैठकीसाठी नितीश कुमार आणि त्यांचा सहकारी पक्ष राजदने प्रयत्न केले. नितीश कुमारांनी देशातील नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांना या बैठकीसाठी तयार केले. त्यानंतर आज नेते मंडळी पाटण्यात दाखल झाली. काही नेते तर कालच आले होते. सकाळी बैठकीला सुरूवात झाली. पंधरापेक्षा जास्त पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा मोठा निर्णय बैठकीत घेतल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.
मेहबूबा शेजारी उद्धव ठाकरे बसले की बसवले ?
जम्मू काश्मिरात मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर हातमिळवणी करत सरकार स्थापन केले म्हणून भाजपला सतत टार्गेट करणारे उद्धव ठाकरे स्वतःच पत्रकार परिषदेच्यावेळी मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याचे दिसून आले. तसे पाहिले तर मेहबूबा मुफ्ती या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे तिथे दिसत नव्हते. नंतर पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे दिसले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना तिथे कुणी बसवले की ते स्वतःच बसेल असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
लिट्टी चोखा, गुलाबजाम आणि चर्चा – राहुल गांधी
यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत विविध पक्षांच्या नेत्यांनी भाष्य केले. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी बैठकीत नेमकं काय झालं हे सांगण्यापूर्वी नितीश कुमार यांनी कसा पाहुणचार केला याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, नितीश कुमार यांनी जेवणात लिट्टी चोखा आणि गुलाबजामची व्यवस्था केली होती असे सांगितले. नितीशजींनी आम्हाला लिट्टी चोखा खाऊ घातला त्याबद्दल त्याचे अनेक आभार. आमच्या सर्वांचे मतभेद असतील, परंतु आम्ही सर्वांनी एकत्र काम करण्याचे निश्चित केले आहे. आजची बैठक ही विरोधी ऐक्याची प्रक्रिया असून, ती पुढे जाणार असल्याचा विश्वास यावेळी राहुल गांधी व्यक्त केला. देश वाचवण्यासाठी काँग्रेस बलिदान देण्यास तयार आहे.
केजरीवालांना झाली घाई पण, काँग्रेसचे वेट अँड वॉच; विरोधकांच्या बैठकीतही पत्ते झाकलेलेच!
केजरीवाल- अब्दुल्ला भिडले
केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात आपने सर्वांचे समर्थन मागितले. याच बैठकीत उमर अब्दुल्ला यांनी केजरीवालांना फटकारले. जेव्हा काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात आले तेव्हा तुमच्या पक्षाने आम्हाला समर्थन दिले नाही संसदेत सरकारला पाठिंबा दिला, असे सांगितले. या बैठकीत दोघांत वाद होत असल्याचे पाहून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.