फुलाला मिळालं मोदींचं नाव, अचानक गाठलं पाकिस्तान; मोदींच्या ‘त्या’ दौऱ्यांचा झाला सुपर इव्हेंट!
PM Modi’s Popular Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. काही ठिकाणी त्यांना विरोध झाला तर काही ठिकाणी त्यांनी केलेल्या कृतीचे कौतुक झाले. इस्त्रायलसारख्या देशाने तर त्यांच्या सन्मानार्थ फुलाचे नाव बदलून त्या फुलाला मोदींचे नाव दिले. चला तर मग त्यांच्या या काही खास दौऱ्यांची माहिती घेऊ या..
पंतप्रधान मोदी जपान दौरा आटोपून नुकतेच पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर गेले होते. येथे विमानतळावर त्या देशाचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी केलेल्या कृतीने मोदींचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला. पंतप्रधान मारापे यांनी विमानतळावर मोदींचे स्वागत करताना त्यांच्या पाया पडले.
2014 मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी अमेरिका, फ्रान्स यांसारख्या प्रगत देशांचा विचार न करता भारताजवळीलच भुतान या लहान देशाचा दौरा केला. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. त्यामुळे या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली होती. केंद्र सरकारने आपल्या नेबर फर्स्ट ही पॉलिसी आणि सीमा भागात चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भुतानची निवड केली होती.
केजरीवालांच्या मदतीला काँग्रेस : संसदेत अध्यादेशाला विरोध करणार
सप्टेंबर 2019 मध्ये मोदी रशियाच्या दौऱ्यावर असताना असाच एक प्रसंग घडला होता. त्याची देश विदेशात चांगलीच चर्चा झाली होती. या दौऱ्यात ईस्ट इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आयोजकांनी मोदींसाठी सोफा आणि इतरांसाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. मोदींनी मात्र स्वतःसाठी सोफा नाकारला आणि इतरांप्रमाणेच स्वतःसाठी खुर्चीची व्यवस्था करण्यास सांगितले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला होता.
पीएम मोदी देशांतर्गत ठिकठिकाणी दौरे करतच असतात. मात्र दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडू या राज्यात त्यांचा विरोधही झाला. फेब्रुवारी 2021 मध्ये मोदी चेन्नईच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ट्विटरवर लोकानी केंद्र सरकारच्या धोरणांचा कडाडून विरोध केला. त्यावेळी ट्विटरवर गो बॅक मोदी हा हॅशटॅग पंधरा तासांपेक्षाही अधिक काळ ट्रेंडमध्ये होता.
भारत आणि पाकिस्तानचे हाडवैर तर सर्वश्रुत आहे. सध्या दोन्ही देशांतील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. तरी देखील पंतप्रधान मोदींनी 2015 मध्ये अचानक पाकिस्तानचा दौरा करून सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यांचा हा दौरा नियोजित नव्हता असे त्यावेळी सांगितले गेले होते. मोदी यांनी काबुलवरुन थेट पाकिस्तानातील लाहोर गाठले. येथे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले. मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.
यानंतर मोदी शरीफ यांच्या घरी गेले, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटले. मोदी 150 मिनिट पाकिस्तानात होती. मोदींचा हा पाकिस्तान दौरा त्यावेळी प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. देशातच नाही तर विदेशातील प्रसारमाध्यमांनी या दौऱ्याची मोठी दखल घेतली होती. विरोधी पक्षांनी त्यांच्या या दौऱ्यावर टीकाही केली होती.
सुरुवातीलाच धुसफूस! मंत्र्याच्या वक्तव्याने काँग्रेस अडचणीत; कर्नाटकात शिवकुमारांचं काय होणार ?
पंतप्रधान मोदी यांचा आफ्रिकेतील रवांडा या देशाचा दौराही एका वेगळ्याच कारणाने गाजला. मोदी जुलै 2018 मध्ये रवांडा देशाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येथील दोनशे गरीब कुटुंबांना दोनशे गायींचे वाटप केले. रवांडाचे राष्ट्राध्यक्ष पॉल कागमे यांनी गरीबीचे उच्चाटन आणि मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी गिरिन्का प्रोग्रॅम देशात सुरू केला होता. या योजनेंतर्गत एका गरीब कुटुंबाला एक गाय दिली जात होती. मोदींनी येथील रुवेरू गावाला भेट दिली. येथील कुटुंबांना दोनशे गायींची भेट दिली.
अमेरिकेत ह्युस्टन शहरात पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत झालेला हाऊडी मोदी कार्यक्रम प्रचंड गाजला होता. मोदींचा 2019 मधील अमेरिका दौऱ्यात याच कार्यक्रमाची चर्चा होती. या कार्यक्रमात पन्नास हजारांपेक्षी जास्त अमेरिकी भारतीय उपस्थित होते. इतकेच नाही तर ट्र्म्प यांचे मंत्रिमंडळानेही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
मागील सत्तर वर्षात कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने इस्त्रायलचा दौरा केला नव्हता. पण, जुलै 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी इस्त्रायलला भेट देत या देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान होण्याचा मान मिळवला. या देशाचे त्यावेळचे पंतप्रधान बेंजामेन नेतन्याहू यांनीही मोदींचे जबरदस्त स्वागत केले. प्रोटोकॉल टाळत मोदींची गळाभेट घेतली. इतकेच नाही तर इस्त्रायल सरकारने पीएम मोदींचा सन्मान करत गुलदाउदी या फुलाला मोदींचे नाव दिले. त्यावेळी मोदींचे स्वागत करताना नेतान्याहू म्हणाले होते की आम्ही मागील सत्तर वर्षांपासून भारतीय पंतप्रधानांची वाट पाहत होतो. मोदींच्या या दौऱ्याची भारतात मोठी चर्चा झाली होती.
2019 मधील लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत मोदींनी केदारनाथला दिलेली भेट. येथे एका ठिकाणी केलेली ध्यान साधना. ध्यानातील त्यांचे फोटो यांचीच चर्चा त्यावेळी झाली होती. सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते.
Raosaheb Danave : आमच्या पंगतीत जेवले अन् खरकटे तोंड घेऊन गेले; दानवेंचा शरद पवारांवर संताप