NTA एकच, मग ‘JEE’ सुरक्षित आणि ‘NEET’चाच पेपर का फुटतो? जाणून घ्या 3 मोठी कारणं…
Why Only NEET Paper Leaks देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट यूजी 2026' पेपरफुटीच्या ग्रहणानंतर रद्द करण्यात आली आहे.
Why NEET Paper Leaks But JEE Mains Remains Secure : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट यूजी 2026’ (NEET-UG 2026) पेपरफुटीच्या ग्रहणानंतर रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर आता 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या सीबीआयच्या तपासावर अवलंबून आहे. मात्र, या गोंधळात एक कळीचा प्रश्न उपस्थित होत आहे तो म्हणजे जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट परीक्षा घेते, तीच संस्था ‘जेईई मेन्स’ (JEE Mains) देखील आयोजित करते. मग जेईईचा पेपर सुरक्षित आणि नीटचाच पेपरचं का फुटतो? या मागच्या कारणांवर कटाक्ष टाकणारा विशेष रिपोर्ट…
दोन्ही परिक्षांमधील फरक नेमका काय?
नीट आणि जेईई मधील सर्वात मोठा फरक त्यांच्या परीक्षा पद्धतीत असू, नीट परीक्षेच्या असुरक्षिततेचे सर्वात मोठे कारण तिचे असलेले ‘ऑफलाइन’ स्वरूप आहे. कारण आजही NEET परीक्षा पेन-पेपर पद्धतीनेचं होते. लाखो प्रश्नपत्रिका छापणे, त्यांचे बॉक्स बनवणे, ट्रकद्वारे शेकडो शहरांतील बँकांच्या तिजोरीपर्यंत पोहोचवणे आणि तिथून परीक्षा केंद्रांवर नेणे ही प्रक्रिया ‘मानवी हस्तक्षेपाने’ भरलेली आहे. या साखळीत एकाही ठिकाणी सुरक्षा भेदली गेली, तरी पेपर फुटतो. तर, याउलट JEE Main’s ही परीक्षा पूर्णपणे CBT म्हणजेच Computer Based Test वर घेतली जाते. येथे कोणताही भौतिक पेपर नसतो. प्रश्नपत्रिका एनक्रिप्टेड स्वरूपात सर्व्हरवर असते, जी परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या काही मिनिटे आधी ‘डिजिटल की’द्वारे उघडली जाते.
एक देश, एक पेपर’ हेच ठरतंय घातक?
पेनपेपर शिवाय नीटचा पेपर फुटण्यामागे परीक्षेचे नियोजन हे देखील नीटच्या पेपरफुटीसाठी जबाबदार मानले जाते. कारण, NEET संपूर्ण देशात एकाच दिवशी, एकाच वेळी घेतली जाते म्हणजेच लाखो विद्यार्थी एकाच प्रश्नपत्रिकेला सामोरे जातात. याचा अर्थ, जर देशाच्या कोठल्याही कोपऱ्यात एक पेपर लीक झाला, तर संपूर्ण देशाची परीक्षा प्रक्रिया बाद ठरते. या उलट JEE Main’s अनेक दिवस आणि विविध सत्रांमध्ये म्हणजे वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये घेतली जाते. एवढेच नव्हे तर, प्रत्येक सत्रासाठी प्रश्नपत्रिका वेगळी असते. जर चुकून एखाद्या सत्रात काही तांत्रिक बिघाड किंवा अनियमितता आढळली, तरी उर्वरित सत्रांवर त्याचा परिणाम होत नाही.
परीक्षा केंद्रांचे ‘नेटवर्क’ आणि सुरक्षा
NEET परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असल्याने एनटीएमार्फत गावागावातील साध्या शाळा आणि महाविद्यालयांना परीक्षा केंद्र बनवले जाते. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांचा अभाव असतो, ज्यामुळे ‘सॉल्वर गँग’ला तिथे शिरकाव करणे सोपे जाते. तर, JEE Main’s केवळ मर्यादित आणि विशेष डिजिटल केंद्रांवरच घेतली जाते. ही केंद्रे हाय-टेक सुरक्षेने सुसज्ज असतात आणि तिथे बाहेरील व्यक्तीचा प्रवेश जवळपास अशक्य असतो.
वारंवार फुटणाऱ्या नीटच्या परिक्षेचा विद्यार्थांच्या मानसिक आणि करिअर दोन्हींवर परिणाम होतो, जोपर्यंत ‘नीट’ परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आणि एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल, तोपर्यंत प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेचे आव्हान कायम राहणार आहे. 2024 आणि आता 2026 च्या अनुभवानंतर, आता नीट परीक्षा देखील ‘ऑनलाइन’ किंवा ‘हायब्रिड’ मोडमध्ये घेण्याची मागणी तज्ज्ञांकडून जोर धरू लागली आहे.