Neet Paper Leak : ‘सीबीआय’कडून 13 आरोपींविरुद्ध न्यायालयात सादर…
नीट पेपर लिक प्रकरणी सीबीआयकडून 13 आरोपींविरोधात दिल्लीच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे.
Neet Paper Leak : नीट-युजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून (Neet Paper Leak ) 13 आरोपींविरोधात दिल्लीच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र करण्यात आले असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पेपर लिक प्रकरणी शिक्षक, कोचिंग क्लासचा संचालक, संबधिंत विषयाचे तज्ञ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ३ मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने नोंदविली होती. त्यानंतर हे प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपविण्यात आले.
नीट पेपर लिक प्रकरणी सीबीआयच्या पुणे, लातूर, राजस्थान, हरियाणा, दिल्लीसह देशभरात छापे टाकून आरोपींना अटक केली. या कारवाईत लॅपटाॅप, मोबाइल संच, तसेच अन्य इलेक्ट्राॅनिक वस्तू जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील आरोपींची बँक खाती गोठविण्यात आली. आरोपींकडून जप्त केलेल्या लॅपटाॅप, संगणक, मोबाइल संच अशा साधनांची पडताळणी करण्यात आली. तपासात परीक्षेपूर्वीच पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती सीबीआयने दिली आहे.
पेपरफुटी प्रकरणातून पुण्यातून परीक्षा प्रक्रियेतील विषय तज्ज्ञ मनीषा मांढरे, लातूरहून प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा हवालदार, शिकवणी वर्ग संचालक शिवराज मोटेगावकर, प्रा. तेजस शहा, तसेच मध्यस्थ डाॅ. मनोज शिरुरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल यांना अटक करण्यात आली होती.
नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत पुणे परिसरातून एकूण 5 जणांना गजाआड केले आहे. यातील 3 महिला आरोपींची नावं ‘मनीषा’ असून, या तिन्ही महिलांनी अत्यंत पद्धतशीरपणे एकमेकांच्या संपर्कात राहून हे रॅकेट चालवल्याचे उघड झाले आहे. यातील पहिली मनीषा वाघमारे पेशाने ब्युटीपार्लर चालक. पैशांच्या हव्यासापोटी या रॅकेटमध्ये विद्यार्थी आणि श्रीमंत पालक शोधण्याची जबाबदारी हिच्याकडे होती. हिच्या चौकशीतून रसायनशास्त्र तज्ज्ञ प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांचे नाव समोर आले. त्यानंतर दुसरी मनिषा म्हणजे प्रा. मनीषा मांढरेला अटक करण्यात आली. मांढरे पुण्यातील नामांकित मॉडर्न कॉलेजच्या बायोलॉजी शिक्षिका. प्रा. कुलकर्णीच्या माध्यमातून सीबीआय मांढेरेपर्यंत पोहोचली. प्रश्नपत्रिका पुढे पास करणे आणि वाघमारेने आणलेल्या ग्राहकांचे डील पूर्ण करण्याची जाबाबदारी मांढरेंकडे होती असे सांगितले जाते.
तिसरी आणि मुख्य कडी सीबीआयच्या जाळ्यात अडकली ती म्हणजे मनीषा संजय हवालदार. प्रा. मनीषा मांढरे हिच्या चौकशीतून या तिसऱ्या मनीषाचा माग लागला. हवालदार सदाशिव पेठेत राहणाऱ्या आणि ‘शेठ हिरालाल सराफ प्रशाले’च्या मुख्याध्यापिका आहे. या प्रकरणातील तिसरी आरोपी मनीषा हवालदार हिच्याबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) तिची ‘नीट’ परीक्षेसाठी ‘भौतिकशास्त्र’ विषयाची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या अतिगोपनीय प्रक्रियेत सामील असल्याने मुख्य प्रश्न थेट तिच्याकडेच उपलब्ध होते.