भविष्यातील युद्धभूमी बदलतेय! OTA गया येथे नव्या अधिकाऱ्यांना आधुनिक युद्धाची दिशा
उदयोन्मुख तंत्रज्ञान, माहितीवरील प्रभुत्व आणि मल्टी-डोमेन ऑपरेशन्स यामुळे भविष्यातील युद्धभूमीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे.
New officers to be guided by modern warfare : “उदयोन्मुख तंत्रज्ञान, माहितीवरील प्रभुत्व आणि मल्टी-डोमेन ऑपरेशन्स यामुळे भविष्यातील युद्धभूमीचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. हायब्रिड, सातत्यपूर्ण आणि अनपेक्षित धोक्यांच्या पार्श्वभूमीवर भावी सैन्यनेत्यांनी बौद्धिकदृष्ट्या चपळ, तंत्रज्ञानाची जाण असलेले आणि कार्यपद्धतीत लवचिक असणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केले.
गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया येथे ७ मार्च रोजी आयोजित विंटर टर्म पासिंग आऊट परेडचा आढावा घेताना त्यांनी नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या समारंभात SSC (Tech) Men-64 मधील 253 आणि SSC (Tech) Women-35 मधील 28 अधिकारी कॅडेट्सना भारतीय सैन्यात अधिकृतपणे अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून प्रवेश मिळवण्याचा हा अभिमानाचा क्षण ठरला. या परेडने कॅडेट्सच्या सैनिक ते अधिकारी या गौरवशाली प्रवासाचे प्रतीकात्मक रूप दर्शवले.
नवीन अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना आर्मी कमांडर यांनी त्यांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि चिकाटीचे कौतुक केले. तसेच कॅडेट्सच्या व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांच्या कुटुंबियांचे आणि प्रशिक्षकांचे योगदानही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. आपल्या भाषणात त्यांनी युद्धाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर, अवकाश क्षेत्र, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम तसेच माहितीवरील प्रभुत्व आणि मल्टी-डोमेन ऑपरेशन्स या आधुनिक घटकांमुळे भविष्यातील युद्ध अधिक जटिल आणि बहुआयामी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर चा उल्लेख करत भारतीय सैन्याच्या जलद आणि अचूक प्रतिसाद क्षमतेचे उदाहरण दिले. या ऑपरेशनमधून मल्टी-डोमेन क्षमतांचे प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण ऑपरेशनल वर्चस्व दिसून आले, असे त्यांनी सांगितले. भारताच्या विकसित भारत 2047 या ध्येयाकडे वाटचाल करताना सशस्त्र दलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण, 14 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार आरोपी; न्यायालयाने दिला आदेश
यावेळी त्यांनी सैन्य नेतृत्वाचे काही मूलभूत तत्त्व “LEADER” या संकल्पनेतून स्पष्ट केले –
L – Lead by Example (आदर्श ठेवून नेतृत्व करणे)
E – Empathy for your Men (सैनिकांप्रती सहानुभूती)
A – Accountability in Command (जबाबदारीची जाणीव)
D – Duty Before Self (स्वतःपेक्षा कर्तव्याला प्राधान्य)
E – Ethical Conduct (नैतिक आचरण)
R – Resilience in Adversity (अडचणींमध्येही धैर्य आणि चिकाटी)
ही तत्त्वे प्रत्येक अधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्त्व, आचरण आणि नेतृत्वासाठी मार्गदर्शक ठरावीत, असे त्यांनी सांगितले. नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी बौद्धिकदृष्ट्या सजग राहण्याचे, तंत्रज्ञानाशी अद्ययावत राहण्याचे आणि परिस्थितीनुसार कार्यपद्धती बदलण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन केले. सैन्य नेतृत्वासाठी नैतिक धैर्य, आत्मविश्वास, करुणा, ठामपणा आणि नम्रता या गुणांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
तसेच त्यांनी सैन्य नेतृत्वाचा शाश्वत सिद्धांतही अधोरेखित केला – “देशाची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण हे नेहमी आणि सर्वप्रथम असते.” OTA गया येथील विंटर टर्म पासिंग आऊट परेड उत्कृष्ट शिस्त, अचूक संचलन आणि समारंभिक परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली. या परेडमधून अकॅडमीकडून घडवले जाणारे शिस्तबद्ध, आत्मविश्वासू आणि जबाबदार सैन्यनेते यांचे दर्शन घडले.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी गया ही संस्था तंत्रज्ञानाची जाण असलेले, शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि नैतिक मूल्यांनी समृद्ध अधिकारी घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतीय सैन्याच्या सेवा, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेच्या परंपरेला पुढे नेणारे अधिकारी येथे तयार होत असल्याचे या समारंभातून पुन्हा अधोरेखित झाले.
