वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येवर पंतप्रधान मोदींचं भाष्य; ‘मन की बात’मधून देशवासियांना दिला ‘हा’ सल्ला

PM Modi on edible oil in Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना (Mann Ki Baat) लठ्ठपणावर मात करण्यासाठी महत्वपूर्ण आवाहन केलं आहे. जगभरात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, आज प्रत्येक आठवी व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाची प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. मुलं लठ्ठ होण्याचं प्रमाण चारपटींनी वाढलं आहे, जे आणखी चिंतेचं कारण असल्याचं सांगत मोदींनी देशवासियांना लठ्ठपणावर मात करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचं आवाहन केलं आहे.
त्यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, लठ्ठपणा सध्या जगाची एक मोठी समस्या झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आकडेवारीचा हवाला देऊन पंतप्रधान म्हणाले की, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २५० कोटी लोकांचे वजन गरजेपेक्षा जास्त होते. हे आकडे अतिशय गंभीर आहेत आणि यावर विचार करणे गरजेचे आहे, असे मोदी म्हणाले. अधिक वजन किंवा लठ्ठपणा विविध आजारांना आमंत्रण देतो. मात्र सर्वांनी एकत्र येऊन छोटे-छोटे बदल केले, तर या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकते असंही ते म्हणाले आहेत.
असा सांगितला उपाय
मोदींनी सांगितले की, खाद्यतेलाच्या वापरात १०% कपात करा. तुम्ही ठरवा की, दरमहा स्वयंपाकासाठी १० टक्के कमी तेल वापरायचे. खरेदी करतानाच १०% तेल कमी खरेदी करायचे. तेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्यासोबतच मोदी म्हणाले की, त्यांनी १० लोकांना असे करण्याची विनंती करावी आणि त्यानंतर त्या १० लोकांनी इतर १० लोकांना तसे करण्यास सांगावे.
मधुमेह आणि तणाव
कार्यक्रमात त्यांनी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि बॉक्सिंगपटू निखत जरीन यांचे ऑडिओ संदेशही प्रेक्षकांना ऐकवले. यात त्यांनी लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांना प्रेरित केले. आहारात तेलाचा कमी वापर आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे ही केवळ वैयक्तिक निवड नसून कुटुंबाप्रति आपली जबाबदारीही आहे. आहारात जास्त तेल वापरल्याने हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक तणाव यासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. आहारात छोटे बदल करून आपण आपले भविष्य निरोगी, सक्षम आणि आजारमुक्त करू शकतो.