Opposition Meeting : आता ही लढाई ‘INDIA’ विरुद्ध ‘NDA’, राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं…
Opposition Meeting : आता ही लढाई INDIA विरुद्ध NDA असल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपला ललकारलं आहे. कर्नाटकातल्या बंगळुरुमध्ये भाजपविरोधी एकूण 26 पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती तसेच यूपीएच्या नामांतराविषयी चर्चा झाली आहे. बैठकीनंतर भाजपविरोधी सर्वच नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल चढवला आहे.
बंगळुरूच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव बदलले; ‘यूपीए’च्या ऐवजी ‘इंडिया’
राहुल गांधी म्हणाले, विरोधकांची लढाई भाजप, मोदींविरोधात नसून देशाच्या आवाजासाठी लढाई आहे. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आजची विरोधकांची बैठक असून आमची लढाई मोदी आणि भाजपच्या विचाराविरोधात नाहीतर देशाच्या आवाजासाठी आहे. भाजप देशात आक्रमक करीत आहेत. देशाची संपत्ती भाजपच्या लोकांच्या हाती असून देशाच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण, सोमय्यांना नाना पटोलेंनीही नाही सोडलं…
तसेच या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याचं राहुल गांधींनी सांगितलं असून विरोधकांची पुढील बैठक ही महाराष्ट्रात होणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. यादरम्यान, युपीएचं नाव बदलण्याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये विचार विनिमय झाल्यानंतर अखेर युपीएचं नाव आता ‘INDIA’ असं ठेवण्यात आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे आता आगामी काळात भाजपविरोधातल्या लढाईला INDIA विरुद्ध NDA असं म्हणावं लागणार आहे. आजची बैठक फलदायी झाली असून आगामी बैठकीत सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र येत विचारधारेविषयी चर्चा करणार असल्याचं राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे. यावेळी बोलताना गांधींनी INDIA चा अर्थही समजावून सांगितला आहे. INDIA म्हणजे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्ल्कुझिव्ह अलायन्स असल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, लालूप्रसाद यादव यांच्यासह एकूण 26 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यूपीएच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या आघाडीच्या अध्यक्षा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना संयोजक बनवले जाणार असल्याचंही समोर आलं आहे.