दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण, सोमय्यांना नाना पटोलेंनीही नाही सोडलं…
Kirit Somaiya : दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण झालं असल्याचं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही (Nana Patole) भाजप नेते किरीट सोमय्यांना (kirit somaiya) सोडलं नाही. दरम्यान, किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल समोर आल्यानंतर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचं प्रकरण उघड झाल्याने विरोधकांनी सोमय्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलं आहे.
Kirit Somaiya : अनिल परबांची मागणी चुकीची, ‘त्या’ महिलेला सुरक्षा द्या, ‘आप’च्या नेत्याची मागणी…
नाना पटोले म्हणाले, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ एका वृत्तवाहिनीने दाखवला आहे, तो बघितल्यानंतरच या विषयावर जास्त न बोलणे योग्य होईल, परंतु दुसऱ्याचं वस्त्रहरण करणाऱ्याचं आज वस्त्रहरण झालं असल्याचं पटोले म्हणाले आहेत.
भाजपकडून 2014 पासून राज्यात सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्याचे वातावरण सुरु आहे. भाजपने कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? अशी परिस्थिती झाली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
सोमय्या कथित व्हिडिओवरून दानवेंचं टीकास्त्र; फडणवीस म्हणाले, ‘हे प्रकरण दाबले जाणार नाही’
किरीट सोमय्यांचा हा मुद्दा काँग्रेससाठी महत्वाचा नसून काँग्रेससाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर उपरोधिक टीका केली आहे. राज्यात महागाई, शेतकरी, महिला, कायदा सुव्यवस्था, तरुणांचे प्रश्न आहेत. महागाई गगनाला भिडली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, सरकार विधानसभेत घोषणा करते पण शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचत नसल्याने हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम काँग्रेस पक्षासाठी महत्वाचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी बोलताना पटोले यांनी विविध मुद्यांवर भाष्य करीत भाजप सरकारला चांगलचं फैलावर घेतलं आहे. बेरोजगारी, नोकर भरती, शिक्षक भरतीमध्ये निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा सरकारचा निर्णय अफलातून असल्याचं म्हणत नाना पटोले यांनी टीका केली आहे. तसेच हा आदेश शिक्षक होऊ पाहणाऱ्या तरुण-तरुणींचा घोर अपमान करणारा आहे. त्यामुळे या आदेशाविरोधात पुण्यात बेरोजगार तरुण आंदोलनही करत आहेत. सरकारने या प्रश्नात लक्ष घालून तरुणांना न्याय दिला पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.